Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

मंगळवार, २५ जुलै, २०१७

काेपर्डी खटला : खंडपीठात अपिलासाठी आरोपीला पुन्हा मुदत


अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी (ता. कर्जत) खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह ६ जणांना बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून तपासण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी आरोपी संतोष भवाळच्या वतीन करण्यात अाली होती. मात्र, ती सत्र न्यायालयाने फेटाळलेली आहे. त्यानंतर १४ दिवसांची मुदत देऊनही आरोपीने खंडपीठात अपिल केले नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. आरोपीच्या वकिलांनी पुन्हा मुदत देण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने आता ७ दिवसांची मुदत दिली आहे.

कोपर्डी खटल्यात सरकार पक्षाचे सर्व साक्षीपुरावे तपासून पूर्ण झालेले आहेत. तिन्ही आरोपींचे जबाबही नोंदवलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी भवाळ याच्या वतीने बचाव पक्षाला ६ साक्षीदार तपासायचे होते. त्यासाठी केलेल्या अर्जात रवींद्र चव्हाण, अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. राजेंद्र थोरात (स्टेट ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स), डॉ. उदय निरगुडकर (संपादक), नाशिकच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे डायरेक्टर व जिल्हाधिकारी अभय महाजन यांचा समावेश होता.

गेल्या वेळी ७ जुलैला दोन्ही बाजूंच्या वतीने या अर्जावर युक्तीवाद झाला. सरकारी वकील निकम यांनी विरोध करीत अर्ज फेटाळण्याची विनंती केली. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. या निर्णयाविरुद्ध खंडपीठात अपील करणार असल्याचे अॅड. खोपडे यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांना २४ जुलैपर्यंत मुदत दिली होती. मात्र, सोमवारी सकाळी कामकाज सुरू होताच आरोपीच्या वकिलांनी अद्यापपर्यंत खंडपीठात अपिलच केले नसल्याचे अॅड. निकम यांनी निदर्शनास आणून दिले.

अॅड. खोपडे यांनी तांत्रिक अडचणींमुळे अपिल दाखल करु शकलो नाही, असे सांगितले. सोमवारी अपिल दाखल करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता करत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने आरोपी पक्षाला आता २९ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. या दिवशी खंडपीठात अपिल दाखल केल्याची काय परिस्थिती आहे, याची माहिती न्यायालयात द्यावी लागेल.
मुद्दाम वेळकाढूपणा - आरोपीला मुदत देऊनही सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल झालेले नव्हते. ही बाब सरकारी वकील निकम यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. आरोपीचे वकील जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करुन खटल्याचे कामकाज लांबवत आहेत, असा आरोप अॅड. निकम यांनी केला. त्यावर आरोपीच्या वकिलांनी तांत्रिक अडचणींमुळे अद्याप अपिल दाखल केले नसल्याचे स्पष्ट केले. अपिल दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages