728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

लाखो भाविकांनी घेतले 'पैस' खांबाचे दर्शन !


नेवासे । DNA Live24 - दिवसभर पावसाच्या जोरदार हजेरीतही माऊलीच्या कामिका एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी नेवासे येथील पैस खांबाचे दर्शन घेतले. आषाढ़ी वद्य एकादशी निमित्त नेवासानगरीचा परिसर माऊलीमय बनला होता. नेवासे नगरीत भक्तीचा सागर उसळला. संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या, संत ज्ञानेश्वर महाराजा़ंच्या स्पर्शाने परिस झालेल्या व माऊलीचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस खांबाचे दिवसभरात सुमारे पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले. 

पहाटे ४ ते ५ या  वेळेत ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्षा संगीता बर्डे, दत्तात्रय बर्डे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, शुभांगी पाटील यांच्या हस्ते माऊलीच्या पैस खांबाला अभिषेक घालण्यात आला. प्रवरासंगमचे उदय सभारंजक यांनी पौरोहित्य केले.

सकाळी देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज, श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर देवस्थानचे सुनीलगिरी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, संजय सुखधान, योगेश म्हस्के, नितीन दिनकर यांनी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर मंदिराला भेट देऊन पैस खांबाचे दर्शन घेतले. या क्षेत्राचा विकास प्राधिकरणामार्फत होण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकड़े प्रस्ताव पाठविणार असल्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. तर पंढरपूर देवास्तानवर निवडही माऊलीचेच आशीर्वाद असल्याचे भास्करगिरी महाराज यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर मंदिरात पहाटे ३ वाजल्या पासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दुपारी गर्दीचे रूपांतर मोठ्या दर्शन बारीत झाले. दर्शन बारीची रांग संत तुकाराम महाराज मंदिरापर्यंत गेली होती. यावेळी भाविकांना तत्परतेने दर्शन घेता यावे, म्हणून मुखदर्शन बारीची व्यवस्था मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून करण्यात आली होती. दिवसभर शेकडो दिंड्यानी ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करीत हजेरी लावली होती. नेवासा फाटा, नेवासा शहर ते ज्ञानेश्वर मंदिर असा सहा किलोमिटर अंतराचा रस्ता तसेच खुपटी रोड गर्दीने फुलून गेल्याने या यात्रेतील गर्दीचा उच्चा़ंक झाला.

मंदीर प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, अद्यक्ष अँड. माधव दरंदले, विश्वस्त पांडुरंग अभंग, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, कैलास जाधव, भिकाजी जंगले यांनी स्वागत केले. तर दर्शन सुलभतेने व्हावे म्हणून रामभाऊ कडू, शिवाजी होन, मच्छिंद्र भवार, भगवान सोनवणे, जालिंधर गवळी, सचिन पंडूरे, सागर पंडूरे, शिवा राजगिरे, भैय्या कावरे, अमृत फिरोदिया, सतीश गायके यांचेसह वैकुंठवाशी बन्सी महाराज तांबे वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली.
शेकडो पोते साबुदाणा खिचडी - मंदिर आवारात पंचगंगा सिडस व जयहरि परिवाराच्या वतीने शाबुदाणा खिचड़ीचे दिवसभर वाटप करण्यात आले. भास्करगिरी महाराज, सुनिलगिरी महाराज, शिवाजी महाराज देशमुख, आमदार बाळासाहेब मुरकुटे, उद्योजक प्रभाकर ससे-शिंदे यांच्या हस्ते खिचड़ी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. नेवासा शहरामध्ये ही उद्योजक रविराज तलवार यांच्या वतीने भाविकांना शाबुदाणा खिचड़ीचे वाटप करण्यात आले.
मुस्लीम धर्मीयांनीही नेवासा बस समोर खिचड़ीचे वाटप केले. लहुजी वस्ताद ग्रुप व इंजिनियर सुनील वाघ मित्र मंडळाच्या वतीने केळीचे वाटप करण्यात आले. तर मध्यमेश्वर पतसंस्थेच्या तसेच मारुतराव घुले पतसंस्थेच्या वतीने ही मंदीर रस्त्यावर फळांचे वाटप करण्यात आले. दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादकांनी दूधाचे वाटप केले. नेवासा फाटा रोडवर संत नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने दिवसभर खिचडी वाटप चालू होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: लाखो भाविकांनी घेतले 'पैस' खांबाचे दर्शन ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24