728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृती व्हॅनसह बीट मार्शल पथक


अहमदनगर । DNA Live24 - आर्थिक व्यवहारातील फसवणूक कशी टाळावी, सामाजिक एकोपा कसा वाढवावा, सोशल मिडिया वापरताना व संभाव्य गुन्हे टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत पोलिस व्हॅनद्वारे शहरात जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी अद्ययावत डिजिटल तंत्रज्ञानयुक्त मिडिया व्हॅन पोलिस दलात दाखल झाली आहे. तसेच शहरातील धूमस्टाईल चोऱ्या, छेडछाड, आदी प्रकार टाळण्यासाठी आता चोवीस तास बीट मार्शल दुचाकी वाहनपथक गस्तीवर असणार आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे.

शनिवारी सकाळी पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उद्धाटन करण्यात आले. या सोहळ्याला पोलिस अधीक्षक शर्मा यांच्यासह अॅडिशनल एसपी घनश्याम पाटील, उपवन संरक्षक ए. श्रीलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक अरुण जगताप,उपमहापौर श्रीपाद छिंदम, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, नगरसेवक सुवेंद्र गांधी, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, यांच्यासह पदाधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

वृक्षारोपण - वन विभागाच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना रोपे देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाची चळवळ आता केवळ शासनाची न राहता, सर्वांची झाली आहे. खऱ्या अर्थाने तिला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी यावेळी केले. तसेच वृक्षारोपणात लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले.

पोलिस मिडिया व्हॅन - पोलिस मिडिया व्हॅनचे उद्धाटन करण्यात आले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये, गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी ही व्हॅन उभी राहिल. डिजिटल बोर्ड तसेच ध्वनीचित्रफितीद्वारे नागरिकांची जनजागृती केली जाईल. आर्थिक व्यवहारातून होणारी फसवणूक, विविध प्रकारच्या अफवा, मोबाईलद्वारे पसरवले जाणारे विघातक संदेश, याबद्दल जनजागृती, उत्सव काळात जनतेने घ्यायची काळजी, परगावी जाताना घ्यावी काळजी, घरफोडी, चोरी, मंगळसूत्र चोऱ्या, बँक अधिकारी बोलत असल्याच भासवून केली जाणारी फसवणूक कशी टाळावी, याबद्दलही जनजागृती केली जाणार आहे.


तत्काळ मदत - बाजारपेठ, बसस्थानके, शाळा, महाविद्यालये, गर्दीची ठिकाणे, संभाव्य धूमस्टाईल चोऱ्या, छेडछाडीचे प्रकार, रोडरोमिआंेच्या बंदोबस्तासाठी विशेष बीट मार्शल (मोटारसायकल गस्त घालणारे) पथक तैनात केले आहे. गरजूंना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी, तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे, असा हेतू आहे. हे पथक शहरात विविध ठिकाणी चोवीस तास कार्यरत असणार आहे. या दोन्ही सेवांचा नागरिकांनी लाभ घेऊन आपल्या मालमत्तेचे तसेच जिविताचे सरंक्षण करावे, काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस दलाने केले आहे.
 बीट मार्शल पथक - पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून आधुनिक बीट मार्शल पथक अस्तित्वात आले आहे. हे पथक शहरात मोटारसायकलवरुन चोवीस तास गस्त घालणार आहे. या पथकामध्ये एकूण २० मोटारसायकलींचा समावेश आहे. तर पथकामध्ये एकूण ४० पोलिसांचा समावेश आहे. त्यामध्ये २० महिला पोलिसही आहेत. महिला पोलिसांची नियुक्ती दिवसाकरिता केलेली आहे. दोन शिफ्टमध्ये हे कर्मचारी दिवसभर गस्त घालतील. अत्याधुनिक मोटारसायकली, आकर्षक पोलिसाची वर्दी, नियंत्रण कक्ष तसेच एकमेकांशी संपर्काकिरता वॉकी-टॉकी, धोक्याची सूचना देणारे सायरन, लाठ्या व हत्यारबंद पोलिस कर्मचारी, असे या पथकाचे स्वरुप आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद बुचके या पथकाचे नेतृत्व करत आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृती व्हॅनसह बीट मार्शल पथक Rating: 5 Reviewed By: DNA Live24