Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, २९ जुलै, २०१७

मुलांनी व्यसनापासून, मुलींनी अनोळखी व्यक्तींपासून लांब रहावे - एसपी रंजनकुमार शर्मा


अहमदनगर । DNA Live24 - अहंकार निर्माण झाल्यास आपला विकास खुंटतो. साधी राहणी व उच्च विचाराने अब्दुल कलाम थेट राष्ट्रपतीपदापर्यंन्त पोहोचले. देशाच्या सर्वोच्च पदावर राहूनही कलाम सर्वसामान्य जीवन जगले. कठिण परिश्रमाला योग्य दिशेची जोड मिळाल्यास जीवनात यशस्वी होता येते, अशी भावना जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केली. डॉ. कलाम यांच्या स्मृतीदिना निमित्त प्रेस क्लब व हेल्पिंग हॅण्ड युथ फाऊंडेशनने घेतलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दिपक चव्हाण, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी रंजनकुमार शर्मा म्हणाले, राष्ट्रपती पदासाठी कलाम यांची निवड होताना, सर्वपक्षीयांनी एकमताने होकार देणे यामध्येच त्यांचे श्रेष्ठत्व लपले आहे. लहान विद्यार्थ्यांना शिकवणे ही त्यांची सर्वात आवडती गोष्ट होती. विद्यार्थी वाईट गोष्टीचा पटकन अंगीकार करत आहे. मुलांना व्यसनापासून तर मुलींना अनोळखी व्यक्तींपासून लांब रहाण्याचे आवाहन केले.

पालकांना मुलांसाठी वेळ काढण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार मिळत असल्याचे सांगून, स्वत:मधील क्षमता वाढविण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणाने अभिवादन करुन करण्यात आली. प्रास्ताविकात महेश महाराज देशपांडे यांनी पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवित असताना, सामाजिक उत्तर दायित्व जपण्याचे काम प्रेस क्लब करत असल्याचे सांगून, राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.

वाचन मर्यादित नसावे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. पुण्यात पत्रकारितेचे धडे गिरवत असताना अब्दुल कलाम यांचा लाभलेल्या सहवासाचे दीपक चव्हाण यांनी कथन केले. विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सहभागी विद्यालयांचा विशेष गौरव करण्यात आला. स्पर्धेतील प्रत्येक विद्यार्थ्यास उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सर्जेपुरातील रहेमत सुलतान सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

हेल्पिंग हॅण्डचे ईस्माइल शेख म्हणाले, वृत्तपत्र विक्रेता ते राष्ट्रपती पदापर्यंन्तची अब्दुल कलाम यांची वाटचाल थक्क करणारी आहे. त्यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याचे सांगितले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यालयांचे आभार मानले. दिपक चव्हाण म्हणाले, कलाम हे युवकांचे प्रेरणास्थान आहे. कोणत्याही कामात त्यांनी कमीपणा बाळगला नाही. त्यांचे व्यक्तीत्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व आदर्शवत आहे. यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.

विजेत्यांचे कौतुक - निबंध स्पर्धेत प्रथम- संस्कार गुंदेचा (भाऊसाहेब फिरोदिया) द्वितीय- श्रृती दहातोंडे (समर्थ विद्या मंदिर), तृतीय- सुमैय्या शेख (अहमदनगर उर्दु हायस्कुल) तर चित्रकला स्पर्धेत प्रथम- साफी शेख (चाँद सुलताना), द्वितीय- स्नेहल निकृड (रुपीबाई बोरा), तृतीय- वैष्णवी लांडगे (बाबासाहेब आंबेडकर स्कूल) यांनी पारितोषिके पटकाविली. यांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके व सहभागी प्रमाणपत्रे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages