728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

माजी सैनिकांना हवेय राजकारणात आरक्षण


अहमदनगर । DNA Live24 - माजी सैनिकांचे प्रश्‍न सुटण्यासाठी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने अण्णांकडे केली. देशभक्तीच्या भावनेने माजी सैनिक राजकारणात येण्यासाठी तयार आहेत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळायला हवे, अशी भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली आहे.

राज्यासह देशात माजी सैनिकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर सैनिक मतदार संघ तयार करावा. याद्वारे माजी सैनिकांचे लोकप्रतिनिधी त्यांचे प्रश्‍न समजून ते सोडवू शकतील. प्रत्येक विभागात एक आमदार, महापालिकेत दोन नगरसेवक, जिल्हा परिषदेत किमान एक सदस्य, तालुक्यात एक पंचायत समिती सदस्य व गावात एक ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी आरक्षण द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन अण्णा हजारे व राज्य सैनिक बोर्डाचे अधिकारी कर्नल सुहास जतकर यांना नुकतेच देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री व राज्यपाल यांना माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठवण्यात आले आहे. त्यांना सर्व माजी सैनिकांनी पत्र पाठविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, जगन्नाथ जावळे, भाऊसाहेब करपे, निवृत्ती भाबड, दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर, सचिन दहीफळे, काशिनाथ कळमकर, सहदेव घनवट, माजी कर्नल साहेबराव शेळके, विश्‍वनाथ कळमकर, रामदास बागडे, माजी सैनिक महिला बचत गटाच्या आशाताई साठे, शेख मेजर, गोपीनाथ डोंगरे आदि उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: माजी सैनिकांना हवेय राजकारणात आरक्षण Rating: 5 Reviewed By: DNA Live24