Header Ads

 • Breaking News

  डाळिंबाच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग  राहुरी । DNA Live24 - गेल्या पंधरवाड्या पासुन डाळींबाचे बाजार भाव स्थिर राहिल्याने भाववाढीबाबत राहुरीतील शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. ऊसाचे आगार म्हणुन ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात पर्यायी पिक म्हणुन भगवा, सुपरभगवा या डाळींबाचे क्षेञ झपाट्याने वाढत आहे.

  राहुरी तालुक्यात तांभेरे, म्हैसगाव, कोळेवाडी, मल्हारवाडी, ताहराबाद, चिंचाळे, कुरणवाडी, वावरथ, बारागाव नांदुर, टाकळीमिया, वांबोरी परिसरात डाळिंबाचे क्षेञ मोठे आहे. आंबा, जांभुळ, पपई या फळांचा सिझन संपल्याने गेल्या पंधरवाड्यापासुन राहुरीत डाळींब विक्रीसाठी दाखल झाले आहेत. 

  आज राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर तब्बल 25 टन डाळींबाची आवक झाली. एक किलो डाळींबाला 20 ते 60 रूपयाचा भाव मिळाला. जून महिन्यात लागवड होणारे फळ म्हणुन डाळींबाची ओळख आहे. घुट्या किंवा डाळींबाचे रोपे, लागवड, मशागत, तेल्या व करपा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना यावर एकरी 50 ते 60 हजार रूपयांचा खर्च पिकावर होत आहे.

  खर्चाच्या तुलनेत डाळींबाला भाव मिळण्याची अपेक्षा शेतक-यांकडुन करण्यात येत आहे. माञ बाजारभाव स्थिर कायम असल्याने भाववाढीची अपेक्षा व्यर्थ ठरली आहे. परिणामी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. बाजारपेठेत चांगले भाव मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad