Header Ads

 • Breaking News

  पिंपळगाव माळवीच्या शेतकऱ्यांसाठी 'शिवप्रहार' रस्त्यावर उतरेल - संजीव भोर


  अहमदनगर । DNA Live24 - पिंपळगाव माळवी (ता.नगर) येथील गोरगरीब शेतकऱ्यांवर मेहेरबाबा आश्रम चालकांकडून अडवणूक व दंडेलशाही केली जात आहे. शिवप्रहार संघटनेने यात लक्ष घालावे, अशी विनंती येथील शेतकरी शिवप्रहारचे संस्थापक संजीव भोर पाटील यांना सातत्याने करीत होते. या पार्श्वभूमीवर संजीव भोर यांनी शनिवारी सायंकाळी पिंपळगाव माळवी येथे प्रत्यक्ष भेट दिली.

  यावेळी महिला, ज्येष्ठांसह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी भोर यांनी सविस्तर चर्चा केली. आश्रमचालकांनी मनमानी करीत अनेक वर्षांपासूनचा जुना वहिवाटीचा रस्ता बंद करून बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमणे व कब्जा केला आहे. ग्रामस्थांचे श्रद्धास्थाने खंडोबा-बिरोबा मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांनाही आडकाठी घातली आहे. आश्रमाकडे जाणाऱ्या मुख्य सार्वजनिक रस्त्यास आश्रमाचा खाजगी रस्ता असल्याची पाटी लावून या रस्त्याने रहदारीस ग्रामस्थांना अटकाव करण्यात येत आहे.

  रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठ्या झाडांच्या फांद्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या घरांवर व विजेच्या तारांवर टेकत असून त्या काढण्यास आश्रमाचे लोक मज्जाव करीत आहेत. यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. आरोग्य,पाणी पुरवठा व इतर सोयी़-सुविधांचा दिखावा व गवगवा करून आश्रमचालक उच्चपदस्थ व धनदांडग्यांशी हातमिळवणी करून व त्यांचेशी असलेल्या संबंधांचा वापर करीत दंडेलशाही, फसवणूक, अडवणूक करून या मंडळींनी शेतकऱ्यांवर दडपशाही चालवली आहे, असे गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आले.

  गोरगरीब शेतकरी यामुळे अक्षरशः मेटाकुटीस आले असून जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी दाद मागूनही न्याय मिळत नसल्याची भावना, संताप यावेळी शेतकर्यांनी व्यक्त केला. मेहेराझाद आश्रमाचे चालक, प्रतिनिधींशीही संजीव भोर यांनी चर्चा करून बाजू ऐकून घेतली. प्रथम शेतकऱ्यांचा अडवलेला रस्ता खुला करून किंवा त्यांना पर्यायी व मान्य होईल, असा सोयीचा रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत आश्रमचालकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांची अडवणूक न करता सामंजस्याचे धोरण अललंबावे, अशी सूचना करून वाद सामंजस्याने मिटत असेल तर आपण समन्वयकाची भूमिका पार पाडू असे भोर म्हणाले.

  यावेळी गोरख आढाव, मारूती झिने, नंदू भोसले, धमाजी भोंदे, भागुनाथ झिने, रामदास झिने, विठ्ठल भोंदे, नारायण गायकवाड, सोन्याबापू गुंजाळ, निर्मला भोंदे, आशा भोसले, सरूबाई भोंदे, रंगनाथ गायकवाड, रंगनाथ शिंदे, एकनाथ पुंड, बाबासाहेब शिंदे, रामभाऊ शिंदे, भगवान भोंदे व इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  रस्त्यावरची लढाई लढू - आश्रमाचे प्रतिनिधी श्री कल्चूरी व श्री पल्लू यांनी इतर ट्रस्टींशी चर्चा करून लवकरच रस्त्याबाबतचा रास्त पर्याय एकत्रित बैठकीत मांडू, असे आश्वासन चर्चे दरम्यान दिले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर पाठबळ देऊन रस्त्यावरची लढाई लढू, असा इशाराही शिवप्रहार संघटनेने दिला आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad