Header Ads

 • Breaking News

  घरफोडी करणाऱ्याकडून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत


  अहमदनगर । DNA Live24 - तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पोलिसाच्या घरातच घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याने दोन घरफोड्यांची कबुली दिली असून ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. तारकपूर बसस्थानक परिसरात रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. सचिन विजय काळे (वय २१, रा. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे.

  तारकपूर बसस्थानक परिसरात सापळा रचून सचिन काळे याला पोलिसांनी पकडले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, राजकुमार हिंगोले, पोलिस हेड कॉन्स्टेबल फकीर शेख, पोलिस नाईक दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, नामदेव जाधव, सागर सुलाने, देवा काळे, संभाजी कोतकर, बबन बेरड यांनी ही कामगिरी केली.

  सचिन काळे बसस्थानकात संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर आधी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्याने तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. हे दोन्ही गुन्हे जानेवारी महिन्यात घडले होते. एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातच त्याने हात की सफाई दाखवली होती. गुन्ह्यात चोरलेला तब्बल ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमालही त्याने पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

  सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे व शेवगावचे पोलिस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून अाणखी काही मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस अधिक चौकशी करीत आहेत. सध्या त्याला तोफखाना पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात वर्ग करण्यात आले असून तोफखाना पोलिस अधिक तपास करीत आहेत.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad