अहमदनगर । DNA Live24 - सोलापूर रस्त्यावरील बंद अवस्थेत असलेल्या कॅन्टोन्मेंट टोल नाक्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा जणांना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्यांचे चार साथीदार मात्र अंधाराचा गैरफायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे एपीआय कैलास देशमाने व त्यांच्या साथीदारांनी रविवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास ही कामगिरी केली. ही टोळी ट्रकचालकांना अडवून लूटमार करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोलापूर रस्त्यावर काही दरोडेखोर वाहनचालकांना लुटत असल्याची माहिती भिंगार पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे एपीआय देशमाने, फौजदार श्रीधर गुठ्ठे, एस. पी. कवडे, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, केदार, सोनवणे, काळे, राजेंद्र सुद्रिक, जंबे, ज्ञानदेव पोटे, सचिन द्वारके, ज्ञानदेव शिंदे, नितीन गांगुर्डे, सचिन वनवे, यांच्या पथकाने सोलापूर रस्त्यावर धाव घेतली. त्यावेळी काही जण अंधारात दबा धरुन बसलेले त्यांनी पाहिले. पोलिसंानी पाठलाग करुन त्यापैकी तिघा जणांना पकडले.
तुषार गणेश डागवाले (भोपळे गल्ली, माळीवाडा), दारासाहेब गंगाधर अरुण (सैनिकनगर, भिंगार) व राहुल दिनकर शेळके (माळीवाडा, नगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून लोखंडी कानस, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी पक्कड, सुरा, मिरची पावडर, चॉपर व एक स्कुटी गाडी पाेलिसांनी जप्त केली आहे. त्यांच्यासोबत असलेले सद्दाम शेख (माळीवाडा), भावेश माणिक नन्नवरे (वाकोडी), महेश भाेगाडे (झरेकर गल्ली, सबजेल) व राधे नवगिरे (वाकोडी) हे फरार झाले.
या सर्व आरोपींविरुद्ध भिंगार पोलिस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असल्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. फरार असलेल्या अारोपींचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे हे करीत आहेत. भिंगार कॅम्प हद्दीत बंद पडलेल्या जकात नाक्यांवर कोणी लुटमार करीत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन एपीआय कैलास देशमाने यांनी केले आहे.