728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

तरूणांची सामाजिक जाणिव कौतुकास्पद - वाव्हळ


अहमदनगर । DNA Live24 - सध्याची तरूणाई सोशल मीडियाच्या विश्वात दंग आहे. या तरूणांची सामाजिक जाणिव ही फक्त मेसेज शेअरिंग पुरतीच मर्यादीत आहे. मात्र, आत्मनिर्धार फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आदर्श उपक्रम अवलंबण्यात आला, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी केले.

निंबळक (ता. नगर) येथील नाथकृपा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आत्मनिर्धार फाऊंडेशन तर्फे चांदबीबी महाल येथे 'निसर्ग पर्यटन सहल व चर्चासत्र' आयोजित केले. तसेच एमआयडीसीतील आठरे पाटील बालगृहातील मुलांसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या उपक्रमात अशोक निंबाळकर, डाॅ. बी. एम. शिंदे, सिद्धिनाथ मेटे महाराज, फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी, दिगंबर डहाळे, धनंजय गायकवाड, रामेश्वर बोराटे, विनोद सूर्यवंशी, संतोष वाघ, संतोष शिंदे, अॅड. योगेश गेरंगे, सागर शिंदे आदींनी सहभाग नोंदवला.

यावेळी वाव्हळ म्हणाले, म्हस्के सर ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करत असतानाच सामाजिक बांधीलकी जपत सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत आहेत. आपण दैनंदिन आयुष्यात जी कमाई करतो, त्यातील काही हिस्सा आपण सामाजिक कार्यासाठी खर्च करायला हवा. पण आजच्या काळात हीच दातृत्वाची भावना कमी होत आहे, अशी सामाजिक जाणिव ठेऊन कार्य करणाऱ्या व्यक्ती समाज घडवतात.

यंदा चांदबीबी महाल या ठिकाणी पर्यटन सहल काढण्यात आली. याच ठिकाणी 'सोशल मीडिया व वास्तव', 'निसर्ग पर्यटन व पर्यटक नागरिकांचे कर्तव्य', ऐतिहासिक ठिकाणांची सद्यपरिस्थिती व स्वच्छता'; अशा विविध विषयांवर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. चर्चासत्रानंतर वाव्हळ यांनी चांदबीबी महाल, भूईकोट किल्ला, गर्भगिरी डोंगर यांविषयी विस्तृत माहिती सांगितली. त्यानंतर सायंकाळी एमआयडीसीतील आठरे पाटील बालगृहात म्हस्के यांचा वाढदिवस मुलांसोबत साजरा करण्यात आला.

मान्यवरांचे स्वागत व आभार बालगृह व्यवस्थापक दिपक काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आतनिर्धार फाऊंडेशनचे समन्वयक संतोष शिंदे, अध्यक्ष महादेव गवळी, सिद्धीनाथ मेटे, दिगंबर डहाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: तरूणांची सामाजिक जाणिव कौतुकास्पद - वाव्हळ Rating: 5 Reviewed By: DNA Live24