Header Ads

 • Breaking News

  ग्रामसमित्या घेणार बाल सरंक्षणासाठी पुढाकार


  नेवासे । DNA Live24 - गाव पातळीवर होणार बालविवाह रोखणे, शून्य ते अठरा वर्षांखालील मुला-मुलींना विविध अडचणींवर मदत करणे, त्यांना सरंक्षण देणे, बालकामगारांचे पुनर्वसन करणे, याकामी आता ग्राम पातळीवर असलेल्या बाल सरंक्षण समित्या पुढाकार घेणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा बाल सरंक्षण कक्ष व इतर शासकीय विभागांमार्फत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येत आहेत. नेवासे तालुक्यातील बाल सरंक्षण समित्यांची प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली.

  अध्यक्ष म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी एस. व्ही. अंकुश हे होते. जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी बाळा हेडे, विधी तथा परिविक्षा अधिकारी गणेश ताठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार अधिकारी एस. एल. माळवदे, नेवासे व वडाळा प्रकल्प कार्यालयाच्या पर्यवेक्षिका लोंढे, गायधने, वैरागर, कुऱ्हे, वडाळा प्रकल्पाचे दशरथ शिंदे, नेवासे तालुक्यातील गावनिहाय आलेल्या एकूण १०० हून अधिक अंगणवाडी सेविका, ग्राम बाल सरंक्षण समिती प्रतिनिधी उपस्थित होते.

  अंगणवाडी सेविकांनी जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी हेडे यांना बाल सरंक्षण समित्या स्थापनेचा अाढावा सांगितला. त्यामागील हेतू व गाव समित्यांमध्ये सदस्य, सचिव तथा अंगणवाडी सेविकांची भूमिका, याबाबत आढावा घेतला. गाव स्तरावर अंगणवाडी सेविकांनी कसे काम करायचे, याची माहिती दिली. गावनिहाय काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासनाच्या विविध योजनेबद्दल मार्गदर्शन केले. लैंगिक अत्याचार व अॅसिड हल्ला झालेल्यांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेची माहिती दिली.

  गणेश ताठे यांनी बाल न्याय अधिनियमानुसार चालणाऱ्या कामकाजाची, बाल सरंक्षण समिती कशी स्थापन करायची, याची माहिती दिली. नेवासे व वडाळा प्रकल्पांतर्गत गटनिहाय ग्राम बाल सरंक्षण समिती स्थापन करुन सरंक्षणाची गरज असलेल्या बालकांची माहिती गट पर्यवेक्षिकेकडे सादर करण्यास सांगितले. विस्तार अधिकारी माळवदे व बाल विकास प्रकल्प अधिकारी अंकुश यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गणेश ताठे यांनी केले. आभार दशरथ शिंदे यांनी मानले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad