कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर असावेत - अत्रे


अहमदनगर । DNA Live24 - आपल्याला कोणत्याही क्षेत्रात कितीही उत्तुंग यश मिळाले व आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय कायम जमिनीवर असले पाहिजेत, असा संदेश चिंटू फेम बाल सिनेकलावंत शुभंकर अत्रे याने दिला. मंथन वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने माऊली सांस्कृतिक सभागृहात आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून तो बोलत होता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे , डॉ. सतीश सोनवणे, कवी शिवाजी सातपुते व कवयित्री जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शुभंकर अत्रे म्हणाला, प्रत्येक मुलांचा बुध्यांक कमी जास्त शकतो. मात्र प्रत्येकामध्ये एक वेगळी क्षमता दडलेली असते, ती क्षमता ओळखून त्यात प्राविण्य मिळावा. अभ्यासा व्यतिरिक्त एखादा छंद जोपासा ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. समाजात आपल्यापेक्षा इतरही अनेक मोठी माणसं मोठी असतात हे कधीही विसरू नका .

डॉ. अक्षय शिंदे म्हणाले, विध्यार्थ्यांनी छोट्या मोठ्या यशाने अजिबात हुरळून न जाता सतत अभ्यास करावा, कष्ट करावेत व कष्टातूनच यश मिळवावे, प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून लोकांचे अनेक प्रश्न सोडविता येतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षांना सामोरे जा. ध्येय निश्चित करा व योग्य नियोजन करा यश नक्कीच मिळते.

एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेले बुलढाणा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे म्हणाले, आयुष्यात कुठलीही संधी दवडू नका. कारण कोणती संधी तुम्हाला कधी यशाेशिखरावर नेऊन ठेवेल ते सांगता येत नाही . यावेळी कवी शिवाजी सातपुते व कवयित्री जयश्री पाटील यांनी प्रेरणादायी कविता सादर केल्या.

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. मंथन वेलफेअर फौंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. निवेदक भगवान राऊत यांनी शुभंकर अत्रे यांच्याशी संवाद साधला.

गणेश पाठक यांनी प्रास्ताविक केले अमोल बागुल व आरजे प्रभू यांनी सूत्रसंचालन केले. किशोर गोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख सचिन नरसाळे, व्यवस्थापक विष्णू काकडे, आश्विनी मंचे, किरण चाबुकस्वार यांच्यासह मंथनच्या टिमने परिश्रम घेतले.