Header Ads

 • Breaking News

  नगर शिवसेनेत इनकमिंग जोरात ! विधानसभेसाठी कार्यकर्त्यांची पेरणी सुरु !

  नगर । DNA Live24 - (खास प्रतिनिधीकडून) - महानगरपालिकेतील सत्तांतरानंतर आलेली मरगळ झटकून नगर शहरात शिवसेनेने आगामी विधानसभेसाठी कार्यकर्त्यांची पेरणी सुरु केली आहे. इतर पक्षातील कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारत आहे. सेना उपनेते अनिल भैय्या राठोड पायाला भिंगरी लावून शहर व उपनगरात दौरे करत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचे चित्र आहे.

  गेल्या विधानसभेला झालेल्या तिरंगी लढतीत भाजपची लाट होती. त्यामुळे भाजपचे उमेदवार असलेल्या अभय आगरकर यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेची मते फिरवली. त्याचा परिणाम म्हणून सलग २५ वर्षे आमदार असलेल्या राठोड यांचा पराभव झाला. त्यावेळी आगरकर यांच्या मागे शहरातून माळी समाजाची मोठी 'व्होट बँक' उभी राहिली होती.

  आताची परिस्थिती पाहिल्यास शहरात आगरकर गट विधानसभा लढविण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे विधानसभेसाठी हाच गट राठोड यांच्या पाठीशी जाऊ शकतो. तसे झाल्यास शहरात शिवसेनेचा मार्ग सुकर होणार आहे. महानगरपालिकेत सेना- भाजप सत्ता असली तरी सेनेला अडचणीत आणण्याची संधी भाजपचा गांधी गट सोडताना दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेने पालकमंत्री शिंदे गटाला जवळ केले आहे. त्यांच्या माध्यमातून अमृतसह विविध योजनांसाठी निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरु झाल्याने पुढील दीड वर्षात शहरात विकासकामांचा धडाका पहावयास मिळू शकतो.

  नुकतेच आंबेडकरवादी चळवळीतील असंख्य कार्यकर्त्यांनी भगवा हाहात घेत शिवसेनेत प्रवेश केला. यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनीही गटबाजीला कंटाळून सेनेची साथ धरली. विधानसभेला राठोड यांना सावेडी, केडगाव, भिंगार या उपनगरातून कमी मतं मिळाली. त्यामुळे राठोड यांनी गेल्या सहा महिन्यांपासून उपनगरात पक्षाची बांधणी करण्यावर जोर दिला आहे. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका असो. एखादी गंभीर, किरकोळ घटना असो. कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरा करणे असो. सर्वच बाबतीत माजी आ. राठोड व त्यांचे सुपुत्र विक्रम राठोड हे पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांना सोबत घेत हजेरी लावत असल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत.

  भाजपची परिस्थिती होतेय बिकट - 

  विधानसभेच्या निवडणुकीवेळी एकसंघ असलेला भारतीय जनता पक्ष शहरात सध्या गटबाजीने विखुरला गेला आहे. सध्याची परिस्थिती पाहिल्यास शहराध्यक्ष असलेल्या खा. दिलीप गांधी व अभय आगरकर यांच्या गटात भाजपची विभागणी झाल्याचे दिसते. विधानसभेला विरोधक असलेले राठोड व आगरकर यांची होत असलेली जवळील गांधी गटाला खटकत असली तरी त्याचा फायदा शिवसेनेला होत आहे. विधानसभेआधी लोकसभेची निवडणूक होत आहे. लोकसभेसाठी भाजपकडून सध्याचे राज्यातील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र असलेल्या सुजय विखेंची चर्चा जोरात आहे. विखे भाजपत आल्यास लोकसभेचे तिकीट मिळणार नसल्याची शाश्वती गांधी गटाला असल्याने गांधी गटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. भाजपकडून विखे लोकसभेसाठी उभे राहिल्यास शहरासह जिल्ह्यातील गांधी गटाचे राजकारण संपल्यात जमा होणार आहे. त्यामुळे गांधी गट गोंधळलेल्या मनःस्थितीत दिसून येत आहे.

  राष्ट्रवादीला चेहरा बदलण्याची गरज -        

  आ. संग्राम जगताप यांच्या राष्ट्रवादी पक्षात दररोज कार्यकर्त्यांची रेलचेल दिसत असली तरी तेच तेच चेहरे पुढे करण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांची नाराजी वाढत आहे. आमदार होण्यापूर्वी असलेली संग्राम जगताप यांची क्रेझ आमदार झाल्यापासून कमी होत चाललेली दिसते. आमदार झाल्यावर वर्षभर जगताप यांनी शहरावर चांगली पकड मिळविली होती. ही पकड कमी होत चालल्याचे दिसते. ठिकठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या संग्राम भैय्या फौंडेशनच्या शाखाही निष्क्रिय होत चालल्या असून त्यांना सक्रीय करावे लागणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये असलेले तेच तेच कार्यकर्ते बाजूला सारून नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागेल.

  कॉंग्रेस तर बेदखलच -        

  कॉंग्रेसचे सत्यजित तांबे यांना अजूनही शहरात पाय रोवणे जमलेले नाही. तीन वर्षात पक्षात थोडेफार राहिलेल्या कार्यकर्त्यांनाही ते सांभाळू शकले नाहीत. त्यामुळेच आ. बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असलेले दिल्लीगेट, सर्जेपुरा भागातील कार्यकर्ते सेनेच्या वाटेवर आहेत. माजी महापौर असलेल्या संदीप कोतकरांना जिल्हाबंदी असल्याने त्यांचे कार्यकर्तेही सेना- राष्ट्रवादीत उड्या मारत आहेत. कॉंग्रेसचा केडगाव बालेकिल्लाही विधानसभेपर्यंत नाहीसा होण्यासारखी परिस्थिती आहे. पक्षाच्या पुरुष पदाधिकार्यांमध्ये असलेले मतभेद भांडणं, मारामाऱ्यापर्यंत पोहोचलेले नसले तरी महिला पदाधिकाऱ्यांनी नुकतीच ही कसर भरून काढली. त्यामुळे पक्षाची होती नव्हती ती गेल्याचे दिसते. म्हणूनच सोशल मीडियाद्वारे मत मांडण्यापेक्षा तांबे यांनी जनसामान्यांकडे लक्ष दिल्याशिवाय पर्याय नाही.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad