Header Ads

 • Breaking News

  “आय एम फ्लेमिंग.. इयान फ्लेमिंग..!”


  DNA Live24 Special -

  “धिस इज बाँड... जेम्स बाँड!” हा हुकमी डायलॉग ऐकल्यानंतर सुरू होतो शत्रूंच्या विध्वंसाचा धडाकेबाज खेळ. तंत्रज्ञानाच्या अचाट कल्पना वास्तवात उतरविल्याचे पडद्यावर पाहण्याचा हा कल्पनारम्य खेळ म्हणजेच बाँडपट. मला अशाच अफलातून चित्रपटांची जोरदार आवड. साय-फाय सिनेमे पाहण्याचा माझा हा उद्योग अजूनही अव्याहत सुरू आहे. यापैकीच एक सर्वाधिक आवडता महानायक म्हणजे आपला जेम्स बाँड.

  जेम्स बाँड्‌स हा नायक पुस्तकी कथांमध्ये रंगविणारे सुप्रसिद्ध लेखक म्हणजेच इयान फ्लेमिंग. त्यांचा जन्म १९०८ मधल्या मी महिन्यातील २८ तारखेचा. तर, या लेखकाने जगाचा निरोप घेतला तो दिवस म्हणजेच १२ ऑगस्ट, १९६४. म्हणजेच आज इयान फ्लेमिंग यांचा स्मृतिदिन. यानिमित्ताने मला पुन्हा एकदा आवडत्या जेम्स बाँडची आठवण झाल्याने केलेला हा लेखनप्रपंच.

  लेखक, पत्रकार आणि दुसर्या महायुद्धातील गुप्तहेर अशी इयान फ्लेमिंग यांची ओळख. जेम्स बाँड आपल्याला चित्रपटांतून सांगतो की, “विधायक कामांशी माझे फार सख्य नाही.” ते बरोबरच आहे. बाँड हा हत्येचा परवाना घेऊन जगभर बेदरकारपणे फिरणारा सर्वाधिक लोकप्रिय नायक आहे. तो अगदी वास्तवात असल्यासारखाच भासत असल्याने बाँडच्या चाहत्याला, बाँड म्हणजे एका लेखकाने निर्माण केलेले काल्पनिक पात्र आहे, यावर विश्वास ठेवायला आवडत नाही. मात्र, हे एक काल्पनिक पात्र असल्यानेच आपल्याला खूप जवळचे वाटते. त्याचे श्रेय जाते लेखक इयान फ्लेमिंग यांना.

  १९५३ मध्ये म्हणजेच वयाच्या ४२ व्या वर्षी इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बाँड कादंबर्‍यांतील पहिली, 'कॅसिनो रोयाल' लिहिली. इयान फ्लेमिंग यांचं १९६४ मध्ये निधन झाले; पण तत्पूर्वी त्यांच्या १४ बाँड कादंबर्‍यांच्या ४० दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या. अशा पद्धतीने हे काल्पनिक पात्र  जागतिक स्तरावर प्रस्थापित झाल. 'बर्ड्‌स ऑफ द कॅरिबियन' नावाच्या लोकप्रिय पुस्तकाच्या लेखकाचे जेम्स बाँड हे नाव इयान फ्लेमिंग यांनी आपल्या कादंबरीच्या नायकासाठी वापरले.

  अतिशय साधे, मवाळ, व निर्विकार असे हे नाव त्यांना आवडले. बाँडचा अधिकृत नंबर (००७) किपलिंगने अमेरिकन रेल्वेसंबंधी एका कथेमध्ये एका नवीन इंजिनासाठी वापरला होता. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या मर्जीतील जॉन डी, स्पॅनिशांविरुद्ध ब्रिटिश गुप्तहेर खात्यात काम करताना ह्याच नंबरनी ओळखला जायचा. म्हणून हा नंबर देऊन ‘डबल ओ सेव्हन’ धासू पद्धतीने जगभर मुशाफिरी करताना  इयान फ्लेमिंग यांनी आपल्या कादंबरीतून रंगवला. आणि माझ्यासह जगातील कोट्यावधी चित्रपट शौकीन (आंबट शौकीन नाही हं...) याच ००७ वाल्या बाँडचे भक़्त झाले.

  इयान फ्लेमिंग यांच्या बाँडची स्वसुखलोलुपता, त्याची व्होडका मार्टिनी 'शेकन नॉट स्टर्ड', महागड्या मोर्लन्ड स्पेशल सिगारेटची तलफ, परस्त्रियांशी भावनाहीन प्रणयाराधन, वेगवान गाड्यांचे वेड यांची आपल्यालाही भुरळ पडते. कादंबरी आणि चित्रपटातील लोकांचे पोषाख, त्यांच्या शरीरावरील तीळ व व्रण, एखाद्याच्या बोटाच्या लांबीतील अनियमितपणा, एखाद्याची मान किंवा कवटीचा विचित्र आकार, या गोष्टींचे मनोरंजक लिखाणांमध्ये बहुधा न आढळणारे, विस्तृत व सबळ विवेचन त्यांच्या लिखाणात येते. त्यामुळेच इयान फ्लेमिंग यांचा बाँड आपल्याला वेड लाऊन जातो. नव्हे, भविष्याचे आडाखे न बांधता आपल्याच धुंदीत मस्त जगण्याची प्रेरणाही देतो... त्यामुळेच आज स्मृतीदिनानिमित्त इयान फ्लेमिंग या सिद्धहस्त लेखकालाही “आय एम फ्लेमिंग.. इयान फ्लेमिंग..!” असं म्हणूनच अभिवादन करावस वाटतं...
  -  श्री. सचिन मोहन चोभे,
  मुक़्त पत्रकार, अहमदनगर

  ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad