728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

खारनाल्यात अडकलेल्या बळीराजाची सुखरूप सुटका !

 एमआयडीसी पोलिस अाणि निंबळक ग्रामस्थांची थरारक कामगिरी


अहमदनगर । DNA Live24 - पावसाचे पाणी वाहत असलेल्या पुलावर अडकलेल्या शेतकऱ्याला निंबळक ग्रामस्थ, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे एपीआय विनोद चव्हाण व इतर पोलिसांनी जीव धोक्यात घालून वाचवले. हा थरार रविवारी दुपारी चाडेचार ते सहा वाजेच्या सुमारास निंबळक परिसरातील खारनाल्यावर घडला. तासभर पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर शेतकऱ्यानेही देवदुताच्या रुपात पोलिस व गावकरी मदतीला आल्याने कृतज्ञता व्यक्त केली. 


बाबासाहेब बबन नेमाणे (रा. रायतळे, ता. पारनेर) असे सुटका झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतमाल विकून परत घरी जात असताना ते खारनाल्याच्या पिक अप वाहनासह खारनाल्याच्या पुलावर अडकले होते. पुलावरुन वेगाने पावसाचे पाणी वहात असूनही मेमाने यांनी पिक अप वाहन पुढे दामटले होते. पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर पाण्याची पातळी वाढल्यामुळे मेमाने तेथेच अडकून पडले. ही घटना महेश म्हस्के या ग्रामस्थाने फोनवरुन एमआयडीसी पोलिसांना कळवली.


एपीआय विनोद चव्हाण, पोलिस नाईक परशुराम नाकाडे, मच्छिंद्र पांधारकर, दत्तात्रय पवार, प्रविण खंडागळे हे तत्काळ घटनास्थळी आले. पोलिसांनी अग्निशमन विभागालाही पाचारण केले होते. तसेच निंबळक गावचे जिगरबाज युवक मच्छिंद्र म्हस्के, प्रशांत म्हस्के, प्रशांत कोतकर, मच्छिंद्र कोतकर, अतुल कोतकर, हर्षवर्धन दिवटे, आदींनी जीव धोक्यात घालत वाहत्या पाण्यात प्रवेश केला. मोठा दोरखंड घेऊन हाताचे कडे करत सर्वजण पुलावरुन चालत मेमाने यांच्यापर्यंत पोहोचले.


पाण्यात सुमारे दीडशे मीटर आतपर्यंत सर्वजण पोहचले. पाऊण तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर मेमाने यांना अखेर सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात पोलिस व ग्रामस्थांच्या चमुला यश आले. संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला जीवाची पर्वा न करता वाचवल्याबद्दल एपीआय चव्हाण, त्यांचे सहकारी व ग्रामस्थांचे सर्वांनी कौतुक केले. निंबळक ग्रामस्थांनी सर्वांचा सत्कारही केला. पावसाच्या पाण्यामध्ये पुलाच्या कठड्यावरुन पाणी वहात असेल, तर पुढे मार्गक्रमण करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: खारनाल्यात अडकलेल्या बळीराजाची सुखरूप सुटका ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24