Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, २० ऑगस्ट, २०१७

'वंदे मातरम'वरुन औरंगाबाद महापालिकेत राडा


औरंगाबाद । DNA Live24 - ‘वंदे मातरम’च्या अवमानावरून शनिवारी (१९ आॅगस्ट) औरंगाबाद महापालिका सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ घालण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एक भाजप आमदार, माजी पदाधिकाऱ्याने भाजपच्याच बड्या नेत्याची मदत घेत गैरव्यवहाराचा ठपका ठेवून निलंबित झालेल्या तीन अधिकाऱ्यांना चौकशी होण्यापूर्वीच कामावर घेतले. त्याचा जाब विचारण्याची तयारी शिवसेनेने केली होती, हे लक्षात येताच अवमान नाट्य घडल्याची चर्चा आहे.

सभा होण्याच्या २४ तास आधीच म्हणजे शुक्रवारी दुपारी भाजपने एमआयएमच्या मदतीने या गदारोळ नाट्याची पटकथा रचली होती, अाता म्हटले जात आहे. शनिवारच्या सभेत ‘वंदे मातरम’ सुरू असताना आसनावर बसून राहणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन १६ आॅगस्टला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वंदे मातरमच्या सन्मानासाठी उभे राहिले होते. विशेष म्हणजे सभा तहकूब होताच एमआयएम, भाजपचे नगरसेवक एकमेकांशी गप्पा मारत हास्यविनोद करत होते. पुन्हा सभा सुरू होताच घोषणाबाजी करत परस्परांवर तुटून पडल्याचे दिसत होते.

१२ वाजता महापौर भगवान घडमोडेंनी सभा सुरू करताच ‘वंदे मातरम’साठी सर्वांनी उभे राहण्याची सूचना केली. मतीन आणि काँग्रेसचे सोहेल शेख वगळता एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच युतीचे सर्व नगरसेवक उभे राहिले. राष्ट्रीय गीत संपताच ठरल्याप्रमाणे घोषणाबाजी सुरू झाली अन् दीड तास याच मुद्द्यावरून गदारोळ झाला. गदारोळात एमआयएमच्या एका नगरसेवकाने भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्हीही गट परस्परांवर तुटून पडले.

अवघ्या दीड तासात तीन वेळा सभा तहकूब झाली. एमआयएमच्या तीन नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केल्याची घोषणा महापौरांनी केली. एमआयएमच्याच दोन सदस्यांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केले म्हणून गुन्हा नोंदवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

तोडफोड - सभागृहात एकीकडे घोषणाबाजी तर दुसरीकडे पकडापकडी असे चित्र होते. एमआयएमच्या सदस्यांनी माईकची तोडफोड केली. एकाने मारण्यासाठी पंखा हाती घेतला. तोडफोड करणारे शेख जफर व सय्यद मतीन यांच्या विरोधात गुन्हे नोंदवावेत, असे आदेश महापौरांनी दिले. तर सय्यद मतीन, जफर यांच्याबरोबर सबीना शेख यांचे सदस्यत्व त्यांनी एक दिवसासाठी निलंबित केले. ही सभा पुन्हा तहकूब करण्यात आली. ही बातमी शहरात पसरताच युतीचे स्थानिक नेते, एमआयएमचे कार्यकर्ते महापालिकेत आले. त्यामुळे तणाव आणखी वाढला होता.

असे फुटले वादाला तोंड - प्रत्येक वेळी महापालिकेत सभेचे कामकाज ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताने सुरू होते. आतापर्यंत कधीच वाद झालेला नाही. मात्र, शनिवारी हे गीत सुरू होण्यापूर्वीच एमआयएम नगरसेविका सबिना शेख यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी हस्तक्षेप करून वंदे मातरम सुरू करण्यास सांगितले. ते सुरू असताना एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख हे जागेवरच बसून राहिले आणि वाद पेटला.

घोषणायुद्ध पेटले - राष्ट्रीय गीत संपताच शिवसेनेचे रावसाहेब आमले यांनी बसून राहिलेल्या दोन सदस्यांचा फोटो काढला. याला दोन्ही सदस्यांनी आक्षेप घेतला. दुसरीकडे युतीच्या सदस्यांनी ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याला एमआयएम तसेच काँग्रेसच्या काही सदस्यांनी ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ अशा घोषणा देत प्रत्युत्तर दिले.

वाद वैयक्तिक - वंदे मातरम म्हणणार नाही, यावर एमआयएमचे नगरसेवक ठाम होते. तर ‘देश मे रहेना होगा, तो वंदे मातरम कहना होगा’ यावर सत्ताधारी अडून होते. हा राजकीय वाद सुरू असतानाच एमआयएमचे नगरसेवक शेख जफर यांनी युतीच्या एका नगरसेवकाला शिवी हासडली आणि हा वाद वैयक्तिक पातळीवर गेला. त्यामुळे आणखीनच तणाव वाढला.

राष्ट्रीय गीत म्हणू - एमआयएम सदस्य आमदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात सायंकाळी एकत्र आले. यावेळी मतीन सय्यद वंदे मातरम सुरू असताना खाली का बसून राहिले, याचा खुलासा मागण्यात आला. ‘अडीच वर्षांपासून आमचे सदस्य कायम हे राष्ट्रीय गीत म्हणतात, यापुढेही म्हणतच राहतील’, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांचे सदस्य वंदे मातरम सुरु असताना खाली का बसून राहिले, याचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages