Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

अन् बिबट्याची छबी झाली क्लिक !


पारनेर गावात बुधवारी सायंकाळी बिबट्या दिसून आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. गावात घुसलेला हा बिबट्या चक्क एका कॉलेजच्या बाऊंड्री वॉलवर निवांत बसला होता. स्थानिकांना तो दिसताच एकच धावपळ उडाली. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तातडीने वनविभागाला माहिती देण्यात आली. यावेळी नगरचे वन्यजीवप्रेमी व निसर्ग अभ्यासक, छायाचित्रकार मंदार साबळे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याची छबी टिपण्यासाठी त्यांनी अनुभवलेला हा थरार, त्यांच्याच शब्दात...

पारनेरमधील एका कॉलेजच्या भिंतीवर बुधवारी सायंकाळनंतर एक बिबट्या बसला आहे, असा फोन रात्री साडेनऊला मला आला. नगरमधून हे अंतर जवळपास ४५ किलोमीटर आहे. तिथपर्यंत पोहचेपर्यंत बिबट्या तिथे राहील कि नाही, याचीही खात्री नव्हती. तरी मी लगेच तिकडे निघालो. माझ्या पोहोचण्याआधी तेथे काही जणांनी अंधारात भिंतीवर बसलेला बिबट्या पाहिला होता. पण मी पोहोचल्यावर मात्र ही स्वारी तिथे नव्हती. मी अंधारातच तो जिथे बसलेला लोकांनी पहिला होता, त्या दिशेने निघालो. 

काही जणांनी मला फार पुढे न जाण्याचा सल्ला दिला. कारण अंधार आणि दाट झाडी, यामुळे समोर नीट दिसत नव्हते. पण तरीही मी त्या भिंतीजवळ तो बसलेल्या ठिकाणी गेलो. अशातही मी विजेरीच्या सहाय्याने बिबट्या कुठे बसलाय हे शोधू लागलो. पण तो पठ्ठ्या काही केल्या दिसेना. माझ्या आधी ज्यांनी पहिला होता त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये अंधारात काही पुसटश्या छबी टिपलेल्या होत्या. बिबट्या दिसलाच नाही, तर मला त्यावरच समाधान मानावे लागणार होते.

मी फार वेळ न दवडता लगेच त्याठिकाणी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना पिंजरा लावण्याची सूचना करून ड्रायव्हरला सांगितले गाडी काढ. आपण या परिसराला राउंड मारू. तो म्हणाला, "साहेब आम्ही किमान १५ राउंड मारलेत, बिबट्या काही दिसला नाही". पण तरीही मी त्याला गाडी काढायला लावली. मी जीपच्या टपावर चढून बसलो. बाकी एक दोन जण गाडीत बसले. मी वरून सर्वदूर विजेरीच्या झोतात लाईट मारून पाहू लागलो. पण बिबट्याची चाहूल लागेना. पण खात्री होती कि तो फार लांब गेला नसावा.

ड्रायव्हर खूप दाट झाडीत गाडी घालण्याची हिंमत करेना . कारण जवळपास असलेला बिबट्या आणि चिखलात गाडी फासण्याचे भय दोन्ही गोष्टी होत्या. त्या परिसरातून शेवटी काहीच दिसेना, म्हणून आम्ही त्या कॉलेज शेजारी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात गाडी घातली. हा परिसरही दाट झाडीचा होता. आम्ही गेटमधून आत जात त्या विश्रामगृहाच्या डावीकडील रस्त्यावर गाडी वळवली. माझी नजर अंधारातही भिरभिरतच होती. डावीकडच्या वळणावर गाडी वळते ना वळते तोच समोर असलेल्या विश्रामगृहाच्या संरक्षक भिंतीवर आमचे लक्ष गेले. 


माझ्या अवघ्या १०-१२ फुटांवर बिबट्या बसलेला दिसला. एवढ्या जवळ असल्याने गाडीतल्या लोकांनीं मला मी टपावर असल्याने सावध राहण्याचा इशारा केला. मी पटकन कॅमेरा काढून त्याचे २-३ फोटो घेतले. पण अंधारात गडबड झाल्याने पुसटश्या छबी आल्या. एव्हाना तो सावध होऊन माझ्या दिशेने पाहू लागला. माझी व त्याची नजरानजर झाली. आणि त्याने माझ्या दिशेने न येता भिंतीवर थोडा मागे जाऊन बसला. मी ड्रायवरला गाडी पुन्हा थोडी पुढे घेण्यास सांगितली. 

आता आम्ही त्याच्या पासून एक २० फुटांवर उभे होतो. मात्र, त्याने आमच्या अस्तित्वाची जराही दाखल न घेता तो भिंतीवर पहुडला. मी मधून मधून त्याच्यावर लाईट टाकून त्याचा अंदाज घेत होतो. सुमारे अर्धा तास तो समोर आणि मी बाहेर टपावर असे बसून होतो. नंतर त्याने माझं थोड लक्ष विचलित झालं आणि अंधारात भिंतीवरून खाली उडी मारली. पण तो नेमका आमच्या दिशेने खाली आला कि विरुद्ध दिशने गेला, हे मात्र कळाले नाही. मी टपावरून खाली उतरलो व त्या दिशेने गेलो पण तो दिसला नाही.

तो बसलेल्या भागात आम्ही नंतर पिंजरा लावला आणि परतीचा मार्ग धरला. कारण रात्रीचा एक वाजत आला होता. मी अंधारात काढलेले त्याचे सुरुवातीचे चार पाच फोटो अंधारामुळे अनफोकस झाले. नंतर मात्र मला त्याचे एक चांगले छायाचित्र मिळवण्यात यश आले. बिबट्याच्या इतक्या कमी अंतरावरुन जवळून भेटीचा, त्याची छबी टिपण्याचा, त्यात यशस्वी होण्याचा हा प्रसंग संस्मरणीय ठरेल, हे निश्चित. 
- मंदार साबळे, 
(छायाचित्रकार, वन्यजीवप्रेमी व निसर्ग अभ्यासक)


ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages