Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

कुख्यात दरोडेखोराने घेतला कोठडीत गळफास

नेवासे । DNA Live24 - शेवगावच्या हरवणे हत्याकांडातील संशयित व नेवासा येथे घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेल्या आरोपी अमोल उर्फ संतोष ईश्वर पिंपळे (वय २३) याने पोलिस कोठडीत आत्महत्या केली. बुधवारी सकाळी तो टॉवेलने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कारागृहातील तिसऱ्या क्रमांकाच्या बराकीत हा प्रकार घडला. या बराकीत आणखी १० आरोपी होते. मंगळवारी न्यायालयात हजर केले त्यावेळी पोलिसांबद्दल काहीच तक्रार नसल्याचे तो म्हणाला होता. त्याच्या आत्महत्येमागे काय कारण असेल, याचा आता राज्य गुन्हे अन्वेषण शाखा तपास करीत आहे.

जून महिन्यात शेवगावच्या विद्यानगर कॉलनीत अप्पासाहेब हरवणणे यांच्यासह एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाली होती. याप्रकरणी अमोल पिंपळेसह आणखी चार जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते. या गुन्ह्यात पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला नाशिकच्या नांदगाव पोलिस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात वर्ग केले. तेथून नंतर पिंपळगाव पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात व १८ ऑगस्ट रोजी नेवासा पोलिसांकडे नोंद असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात वर्ग केले होते. गुन्ह्यात चोरलेले काही सोने त्याने एका सोनाराकडे सोने विकल्याची कबुली दिली होती.

अमोल पिंपळेने पोलिस कोठडीत आत्महत्या केल्याची माहिती मिळताच बुधवारी सकाळी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, पोलिस अधीक्षक रमेशकुमार गायकवाड (सीआयडी, नाशिक), पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी नेवासे पोलिस ठाण्यात भेट देवून घटनेची माहिती घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार व उपअधीक्षक अभिजीत शिवथरे, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक सोनाली कदम हे दिवसभर नेवासे पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते.

नगरच्या सीआयडीचे वरिष्ठ पथक पोलिस उपअधीक्षक कृष्णा यादव, पोलिस उपअधीक्षक हरिभाऊ जाधव हेही नेवाशात दाखल झाले. आत्महत्या करणारा अमोल उर्फ संतोष हा नेवासे तालुक्यातील गिडेगावचा रहिवासी आहे. त्याच्यावर एकट्या नेवासा पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचे ११ गुन्हे दाखल आहेत. त्यात भारतीय हत्यार कायदा कलमान्वयेही एका गुन्ह्याची नोंद आहे. १८ ऑगस्टला माळीचिंचोरा येथे रविंद्र शेंडे यांच्याकडे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात तो सध्या पोलिस कोठडीत होता. 

मंगळवारी दुपारी पिंपळेला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याने गुन्ह्याची कबुली देवून चोरलेला काही मुद्देमालही पोलिसांना काढून दिला होता. गुन्ह्यात सहभागी असलेले त्याचे साथीदार अमोल शिवाजी भोसले व सुंदर शिवाजी भोसले फरार आहेत. शेवगाव येथील खुनाच्या गुन्ह्याव्यतिरिक्त अमोल पिंपळेवर नांदगाव व पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथे दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. एकूण चौदापैकी ५ गुन्ह्यात त्याने कबुली देऊन मुद्देमालही काढून दिलेला आहे, असे पोलिस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे म्हणाले.

क्षमतेपेक्षा अधिक कैदी - नेवासा कारागृहात चार बराकींत १८ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात तेथे एकूण ४८ कैदी होते. न्यायालयीन कोठडीतील ४७ व पोलिस कोठडीतील अमोल पिंपळेचा समावेश होता. तीन नंबरच्या बराकीत अमोलसह ११ आरोपी होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अमोलने कारागृहातील बाथरूमजवळ कठड्याच्या वरील बाजूस जाळीला टॉवेलने गळफास घेतला. गार्ड ज्ञानेश्वर देवकाते यांनी तशी खबर दिली. त्यांच्यासह ड्युटीला पोलिस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. खिळे व एस. व्ही. नागरगोजे, बी. एन. तागड हेही होते.
तिच्या लग्नाचा धसका? - अमोलच्या पश्चात आई, बायको व मुले असा परिवार आहे. मंगळवारी अमोलची मामी बालीताई रामसिंग भोसले, माधुरी रामसिंग भोसले या दोघी जणी त्याला भेटून गेल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या महिलांनी अमोलला "तू गुन्ह्यातून सुटत नसल्याने आम्ही तुझ्या बायकोचे दुसरे लग्न करून देणार आहोत', असे सांगितले होते. त्यामुळे तो अस्वस्थ होता. तसेच मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याने पोलिसांविषयी काहीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय त्याच्यावर मोक्का लावण्याचेही प्रस्तावित होते. त्यामुळे तो नैराश्यात होता.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages