728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

लोणीत पोलिस-दरोडेखोरांमध्ये तीन तास सिनेस्टाईल चकमक


राहाता, श्रीरामपूर । DNA Live24 - श्रीरामपूर- बाभळेश्वर- लोणी रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री टेम्पो चालकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीची लोणी पोलिसांशी सिनेस्टाईल चकमक झाली. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबाराला पोलिसांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले. तीन तासांच्या चकमकीत अखेर ४ दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तिघे जण फरार झाले. सर्व आरोपी श्रीरामपूरचे कुख्यात आहेत. श्रीरामपूर व लोणी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध दरोड्याच्या चार गुन्ह्यांसाह एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले.

सोमवारी मध्यरात्री लोणीचे एपीआय रणजित गलांडे यांना लोणी- बाभळेश्वर रस्त्यावर वाहनांना लुटण्याचा प्रकार सुरू असल्याचे समजले. त्यांनी सहकारी पोलिस तसेच राजुरी, ममदापुर ग्रामस्थांच्या मदतीने नाकाबंदी केली. या रस्त्यावर आयशर टेंपो व छोटा हत्ती अडवून चालकांना कत्तीने मारहाण केल्याची व त्यांच्याकडून एटीएम कार्ड, रोकड, मोबाईल काढून घेतल्याची घटना घडली होती. आरोपींचा पाठलाग करताना आरोपीने गावठी कट्ट्यातून पोलिसांवर गोळीबार केला. धारदार शस्त्राने हल्ला केला. दुचाकी अंगावर घालून एका पोलिस कर्मचाऱ्याला जखमी केले. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही फायरिंग केले.

चार आरोपी बाभळेश्वरहून निर्मळ पिंप्री रस्त्याने जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपी दुचाकी सोडून शेतात पळाले. पोलिसांनी डाळिंबाच्या शेतात दोघांना पकडले. तर दोन जण उसाच्या शेतातून पसार झाले. दोघेजण अगोदरच पसार झाले होते. पोलिसांनी तौफिक सत्तार शेख (वय 31), राहुल विलास शेंडगे (वय-19 रा. अशोकनगर, श्रीरामपूर) यांना पकडले. नंतर गौरव रवींद्र बागुल व किरण सुरेश काकफळे (रा. श्रीरामपूर) यांनाही अटक केली. इतरांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली. 

सर्व आरोपी रविवारी रात्री अकराच्या सुमारास दत्तनगर येथील संतोष पवार यांच्या घराजवळ गांजा पीत बसले होते. पवार यांनी त्यांना हटकल्याने आरोपीनी पवार कुटुंबियांना घरात घुसून काठी व कत्तीच्या साह्याने मारहाण करून त्यांच्या घरातील टी. व्ही., दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर ते दुचाकीवरून बाभळेश्वर-लोणी रस्त्याने रास्ता लुटीसाठी आले होते. लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन टेम्पो लुटल्याने याठिकाणी दरोड्याचे तीन तर दत्तनागरच्या घटनेने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा एक असे दरोड्याचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच जीवे मारण्याचा आणखी एक गुन्हा लोणी पोलिसांनी दाखल केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत सूचना दिल्या. पोलिसांनी एक पल्सर दुचाकी,दोन सत्तूर,एक टॉमी आरोपींकडून जप्त केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.


  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: लोणीत पोलिस-दरोडेखोरांमध्ये तीन तास सिनेस्टाईल चकमक Rating: 5 Reviewed By: DNA Live24