728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

तिरमली समाजातील ४० कुटुंब जातीतून बहिष्कृत


अहमदनगर । DNA Live24 - तिरमली समाजाच्या जातपंचायतीच्या पंचांनी जातीतून बहिष्कृत केले. पुन्हा जातीत परत घेण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागितली. तक्रारी केल्याने जीवे मारण्याचीही धमकी दिली, अशी फिर्याद नगर तालुक्यातील एका पीडित कुटुंबाने पोलिसांत दिली आहे. त्यावरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात नव्यानेच अस्तित्वात आलेल्या सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकूण २५ जणांना आरोपी करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समिती बहिष्कृत केलेल्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आला.

हे आहेत आरोपी - गंगा तुकाराम फुलमाळी, संजय गंगा फुलमाळी, शिवराम गंगा भिंगारे (तिघे रा. भेंडा फॅक्टरी, नेवासे), उत्तम हणुमंत फुलमाळी, लक्ष्मण हनुमंत फुलमाळी (दोघे रा. जेऊर हैबती, नेवासे), सुभाष बाळू फुलमाळी (शिंगणापूर), उत्तम दौलत फुलमाळी (पाथरवाला), तात्या शिवराम गायकवाड, रावसाहेब तात्या गायकवाड, साहेबराव रंगनाथ उंबरे, उत्तम रंगनाथ उंबरे (चौघे रा. ढोरजळगाव), शेतीबा राणा काकडे, गुलाब शेटिबा काकडे (रा. वाळकी, नगर), गंगा वेंकट मले, साहिबा महादू काकडे, रामा शिवराम फुलमाळी, बापू वेंकट फुलमाळी (ढोकराई, जोगीवस्ती, श्रीगोंदा), भीमागोपाळ गायकवाड (जवळा, पारनेर), रामा साहेबा फुलमाळी, शिशापा माणिक काकडे, साहेबराव माणिक काकडे (तिघे रा. ओझर, जुन्नर, पुणे), आण्णा बापू फुलमाळी (झापवाडी, जुन्नर, पुणे), साहेबा रावजी काकडे (भातोडी, नगर), रामा बाबू काकडे, सुभाष गंगा मले (दोघे रा. ढोकराई, श्रीगोंदा).

आरोपींनी पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर, बीड जिल्ह्यातील आष्टी येथे वेळोवेळी बेकायदेशीर जातपंचायतीचे आयोजन केले. या जातपंचायतीमध्ये तिरमली समाजाच्या बाबूराव साहेबराव फुलमाळी (वय ३५, रा. निमगाव गांगर्डा, ता. कर्जत) याच्यासह ४० कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केले. या सर्व कुटुंबांकडून प्रत्येकी २ हजार, याप्रमाणे एकूण ८० हजार रुपये घेऊन खंडणी वसूल केली. 

बाबुरावने जातपंचायतीला विरोध केला म्हणून १६ जुलैला नगर तालुक्यातील गारमाळा येथील तिरमली वस्तीवर झालेल्या सभेत त्याला व त्याच्या भावंडांना जातीतून बहिष्कृत करण्यात आले. त्यामुळे बाबुरावने अखेर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचे ठरवले. शुक्रवारी सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. सहायक पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध यापूर्वीही ठिकठिकाणी खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा रंजना गवांदे यांनी पाठपुरावा केल्यामुळे अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपींवर यापूर्वीही गुन्हे - तिरमली समाजाच्या जातपंचायतीच्या २५ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नव्यानेच आलेल्या सामाजिक बहिष्कृतता विरोधी कायदा, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, आदी कायदा कलमांन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यातील बहुतांश आरोपींवर जातीतून बहिष्कृत करत खंडणी मागण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यांच्यावर श्रीगोंदा, संगमनेर, शिर्डी, राहुरी, आदी पोलिस ठाण्यांमध्ये खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: तिरमली समाजातील ४० कुटुंब जातीतून बहिष्कृत Rating: 5 Reviewed By: DNA Live24