Header Ads

 • Breaking News

  नगर शहर वकील संघटनेची कार्यकारिणी बरखास्त‌‌ ?


  अहमदनगर । DNA Live24 - तब्बल दीडशे वर्षाचा इतिहासात नगर शहर वकील संघटनेत आपापसांतील वाद चांगलेच उफाळले. गुरुवारी सव्वाशे वकिलांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत सध्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा ठराव मांडण्यात आला. तसेच पुढील कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारीही नियुक्त करण्यात आले. तर वकील संघाच्या अध्यक्षांनी मात्र ही सभाच बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. आपली कार्यकारिणी जानेवारीपर्यंत कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

  वकील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण कचरे व कार्यकारिणीवर बहुतांश सभासदांचा रोष आहे. त्यामुळे वकील संघाची कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी अॅड. तुळशीराम बाबर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली. अॅड. कारभारी गवळी, अॅड. सुरेश लगड यांनी अॅड. बाबर यांना बैठकीचे अध्यक्ष म्हणून घोषित केले. बाबर यांनी सर्वानुमते सध्याचे अध्यक्ष लक्ष्मण कचरे यांची कार्यकारणी बरखास्त करत असल्याचा निर्णय जाहीर केला. उपस्थित वकिलांनी त्याला मंजुरी दिली.

  अध्यक्षांनी नगरच्या बारमध्ये दोन गट निर्माण केले, २६ जानेवारीलाच कार्यकारिणीची मुदत संपली आहे, तरीही अध्यक्ष पद सोडत नाहीत, बारला कधीही विश्वासात घेतले जात नाही, त्यामुळे वकील संघटनेच्या कार्यक्रमांत वकील कमी व इतर नागरिकच जास्त, कार्यकारिणी वकिलांचे प्रश्न सोडवायला प्रयत्न करीत नाही, त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे आरोप ठेवत कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  वकील संघाच्या कार्यकारिणीबद्दल असलेल्या घटनेचा आधार घेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. कल्याण पागर यांची, तर अॅड. महेश काळे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. अॅड. पागर लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील, असेही जाहीर करण्यात आले. गेल्या ८ महिन्या पासून लोकशाही पासून दूर असलेले काम संपुष्टात आले आहे, असे प्रतिपादन अॅड. तुळशीराम बाबर यांनी केले.

  यावेळी अॅड. गवळी, अॅड. सुरेश लगड यांनी मनोगत व्यक्त करताना बारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी अॅड. मन्सूर जहागीरदार, अॅड. नंदू गाडे, अॅड. एम. के.काकडे, अॅड. महेश काळे आदींचे भाषणे झाली. यावेळी अॅड. रमेश जगताप, अॅड. मंगेश सोले, अॅड. अनिता दिघे, अॅड. राजेश कातोरे, अॅड. बाळासाहेब पवार यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.

  सभाच बेकायदेशीर - आमच्या कार्यकारिणीची मुदत २२ जानेवारी २०१८ रोजी संपत आहे. त्यामुळे कार्यकारिणी बरखास्त होण्याचा प्रश्नच नाही. गुरूवारी झालेल्या वकिलांच्या बैठकीबाबत वकील संघाला कोणीही काही कळवलेले नव्हते. कार्यकारिणी बरखास्त करायची असेल, तर अध्यक्षांना बोलवणे अपेक्षित होते. वकील संघावर आरोप करणारांमुळेच वकील संघटनेत फूट पडली आहे. फक्त प्रसिद्धीसाठी आरोप केले जातात. त्यांना बैठक बोलवायचा अधिकारच नाही. त्यामुळे ही सभाच बेकायदेशीर आहे. - लक्ष्मण कचरे, अध्यक्ष, बार असोसिएशन

  ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  Post Top Ad

  Post Bottom Ad