Header Ads

  • Breaking News

    गणेशोत्सव : शेवटचे तीनच दिवस बारापर्यंत देखावे


    अहमदनगर । DNA Live24 - गणेश उत्‍सवात शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत देखावे सादर करण्यास, ध्वनीक्षेपणास परवानगी द्यावी, अशी मागणी मंडळांच्या वतीने करण्यात आली. मात्र, उच्‍च न्‍यायालयाच्या आदेशानुसार शेवटचे तीन दिवसच ध्‍वनीक्षेपणाच्‍या वेळेत वाढ करण्‍यास परवानगी आहे. त्यामुळे शेवटचे तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपणास परवानगी दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली. पोलिस मुख्‍यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

    या बैठकीला अपर जिल्‍हाधिकारी भानुदास पालवे, जिल्‍हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, महापालिका आयुक्‍त घनश्‍याम मंगळे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक घनश्‍याम पाटील, कॅन्‍टोन्‍मेंट बोर्डाचे मुख्‍याधिकारी माने, निवासी उपजिल्‍हाधिकारी गोपीचंद कदम, शांतता कमिटीचे सदस्‍य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलिस, महापालिका व वीज मंडळाचे अधिकारी, आदी उपस्थित होते.

    यावेळी पालकमंत्री शिंदे म्‍हणाले, गणेश उत्‍सव व इतर सर्व सण शांततेत पार पाडण्‍यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. देखावे व मिरवणूक पहायला येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी महापालिकेने खड्डे बुजवावेत. ड्रेनेज दुरूस्ती करावी, कचरा उचलावे. विद्युत मंडळाने या काळात वीज पुरवठा खंडीत होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

    शांतता समितीचे सदस्‍य उबेद शेख, गणेश अष्‍टेकर, नलिनी गायकवाड, संजय सपकाळ, जरिना पठाण, कैलास गिरवले, पंडीत खरपुडे, आशा निंबाळकर आदिंनी गणेश उत्‍सव शांततामय वातावरणात पार पाडण्‍यासाठी सूचना केल्‍या. गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन उबेद शेख यांनी केले.

    भिंगारच्या गणेश मंडळांनाही विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी, भिंगारमधून गेलेल्या महामार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी केली. आशा निंबाळकर यांनी शहरातील रस्ते व खड्ड्यांची दुरूस्ती करण्याची मागणी केली. जरीना पठाण यांनी अवजड वाहतुकीला आळा घालावा, अशी सूचना मांडली. कैलास गिरवले यांनी अखेरचे पाच दिवस ध्वनीक्षेपक वाजवण्यास परवानगी मागितली.

    पंडित खरपुडे यांनी पाकिटमारांचा बंदोबस्त करावा, अशी विनंती केली. अन्वर शेख, नलिनी गायकवाड, शाहबाज शेख यांनीही सूचना मांडल्या. बकदी ईद सणाच्या दिवशी पोलिस बंदोबस्त वाढवण्याची विनंती करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहकार्य करण्याचे अाश्वासन सर्वांनी दिले. सूत्रसंचालन अॅड. शिवाजी अण्णा कराळे यांनी केले.

    विसर्जनापर्यंत शहरातील मंडळांच्या परिसरातील सर्व खड्डे बुजवणार आहोत. विसर्जन मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांनी दिले. कचरा उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. गणेशोत्सवात दोन शिफ्टमध्ये हे काम केले जाईल. नागरिकांनी चौकात कचरा गोळा केल्यास हे काम सोपे होईल. ड्रेनेजदुरुस्तीही केली जाईल, अशी माहिती आयुक्त मंगळे यांनी दिली
    शहर व जिल्ह्यातील शिस्तबद्ध व उत्कृष्ट गणेश मंडळांना आकर्षक ट्रॉफी दिल्या जातील. त्यासाठी पोलिस, शांतता समिती सदस्य, पत्रकार, महसूलचे अधिकारी, मंडळांचे परीक्षण करतील. खड्डे दुरुस्ती, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, यासाठी ४ महिन्यांपासून मनपाकडे पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. गणेशोत्सवात वाहतुक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊ, असेही ते म्हणाले. 
    ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

    Post Top Ad

    Post Bottom Ad