Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

भाजपा सरकार म्हणजे 'जीवघेणा विषाणू' !


अहमदनगर । DNA Live24 - शेतकर्‍यांच्या सुकाणू समितीवर टीका करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी जमिनीवर येऊन आमच्याशी खुल्या व्यासपीठावर चर्चा करावी. शेतकर्यांना देशद्रोही ठरवताना सुकाणू समितीला 'जीवाणू' म्हणणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. भाजपाने शेतीव्यवस्थाच मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे हे सरकारच शेतकर्‍यांसाठीची जीवघेणा विषाणू ठरला आहे. या विषाणूला कायमची मूठमाती देण्यासाठी शेतकरी पुढे येतील, असा इशारा प्रहार वारकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारस्कर यांनी दिला आहे.

शेतकरी आत्महत्याप्रकरणी विरोधी पक्षनेते असताना फडणवीस यांनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. त्याच फडणवीसांकडून आता शेतकर्‍यांची चेष्टा केली जात आहे. देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची फॅक्टरी काढल्यागत त्यांनी शेतकरी आंदोलकांना देशद्रोही ठरवले. आमच्या ‘देशभक्त‘ मुख्यमंत्र्यांनी भूतकाळातील वक्तव्याचे व पदाच्या कर्तव्याचे भान ठेऊन शेतकरी आत्महत्यांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन अजय महाराज बारस्कर यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांना चढलीय सत्तेची नशा - मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना ध्वजवंदन करू न देण्याची विनंती करणार्‍या शेतकरी आंदोलकांना थेट देशद्रोही संबोधले. मुख्यमंत्र्यांना सत्तेची नशा चढल्यानेच त्यांना जबाबदारीचे भान उरले नाही, असा आरोप बारस्कर महाराज यांनी केला आहे. प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री हा कोणत्याही पक्षाचा नूसन संपूर्ण महाराष्ट्राचा असतो, याचाच विसर फडणवीस यांच्यासह त्यांच्या सत्तांध भाजपाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहंकारातून शेतकरी सुकाणू समिती व आंदोलकांना देशद्रोही ठरवले. या बेजबाबदार सरकारला सत्तेवरून खेचण्यासाठी शेतकरी आंदोलक प्रयत्नशील नाहीत. कारण सरकार कोणतेही असो, शेतकरी व कष्टकर्‍यांची पिळवणूक ठरलेली असते. यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारऐवजी भाजपाचे सरकार अधिक कोडगे व शेतकरी विरोधी असल्याची शेतकर्‍यांची भावना झालीय, असे बारस्कर महाराज म्हणाले.

सरकारची कोंडी करु - राज्यातील सर्वच पक्षांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे राजकारण केले. पण अन्यायाविरोधात बोलणार्‍यांना देशद्रोही ठरविण्याचे धारिष्ट्य आजवर कोणी केले नव्हते. फडणवीस यांनी शेतकरी प्रश्नासाठी लढणार्‍यांना हे बिरुद चिकटवले, त्यामुळे शेतकर्‍यांत तीव्र संताप आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा, शेतकरीही मुख्यमंत्र्यांसह सरकारची कोंडी केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा बारस्कर महाराज यांनी दिला आहे.


ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages