Header Ads

 • Breaking News

  जगण्याचा 'अर्थ', की अन्वयार्थ..?


  त्रकारितेमधील ब-यापैकी सुखाची मानली जाणारी नोकरी सोडून मी सध्या शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी लढतोय. यातनं जीवनाला अर्थ मिळवून देण्यासाठी जीवनाचा अर्थ समजून घेण्याचाही प्रयत्न करतोय. सामाजिक संस्थेसह शेतकरी संघटनेच्याही मदतीने माझा हा छोटासा प्रयत्न सुरू आहे. माझ्या काही मित्रांना याचं कौतुक वाटतं. त्यांना मी सांगत असतो, "पत्रकारितेच्या क्षेत्रात तपपूर्ती केल्यानंतर मला उमगलंय की जीवनात अर्थ (पैसा) महत्वाचा नसून, जीवनाचा अर्थ समजून घेऊन समाधानानं जगायला शिकण्याचा मी प्रयत्न करतोय. माझी एकुण समाज व शेतक-यांसाठीची तळमळ स्वार्थीच आहे. कारण मी या कामातून आत्मिक समाधान मिळवतोय. बाकी यात विशेष असं काहीच नाही. माझ्याच जीवनाचा अन्वयार्थ लावण्याचे विविध प्रयत्न म्हणजेच तुमच्या दृष्टीने समाजसेवा आहे. बस, इतकं सोपं आहे हे..."

  सचिन चोभे
  जीवनाचा अन्वयार्थ समजून घेण्याच्या माझ्या या स्वार्थी प्रयत्नांना माझेच काही धनाढ्य (म्हणजे वार्षिक दहाएक लाख उत्पन्न असणारे) 'मित्र' टिंगलीचा विषय बनवतात. मीही मग अशा 'यशस्वी सत्पुरुषां'च्याच स्तरावर जाऊन उत्तरं देतो. या मित्रांच्या दृष्टीने पैसा म्हणजेच आनंद..! परंतु, आनंद म्हणजे नेमकं काय, याचंही त्यांचं आकलनं मोठं गमतीशीरच.

  पैसा मिळविण्यासाठीचे मग वाम मार्गही या मित्रांना गैर वाटत नाहीत. दररोज देवदेव करून पैशांसाठी झटणारे असे 'मित्र' मला म्हणतात, "काय करतोय ती समाजसेवेची नाटकं. आम्ही बघं कसे मजेत जगतोय. खरा पैसा समाजसेवा करून नाही मिळत. दोन नंबरच्या नादी लाग... कशाला असली नाटकं करून लोकांनाच नादी लावतोय. दोन नंबरात ये. खरा मानमरातब अन् पैसाही यातच आहे..." 

  एक राजकारणात थोडी लांब उडी मारलेला मित्र नुकताच म्हणाला, "काय तत्व व नितीनियमांना चिकटून बसलाय यार. सोड ते. तत्वांमुळे कुटुंबालाही सुख देऊ न शकणारा तू काय समाजसेवा करणार. माझं बघं. बंगला बांधला. गाडीतून फिरतोय. तालुक्याचं नेतृत्व करतोय. तुझं काय...?"

  मीही बापुडा मग अशा फुकटचे सल्ले देणा-या 'यशस्वी' उद्योजक व राजकारणी असलेल्या 'निस्वार्थी मित्रां'कडून करमणूकच करून घेतो. माझं उत्तर ठरलेलं असतं. "मला सांगा दोन नंबरनी तुम्ही कितपत समाधानी आहात? पैसे असुनही कितपत आनंद तुम्हाला मिळतोय? अन् महत्वाचं म्हणजे दोन नंबरनी पैसे कमवून कोणी टाटा झाल्याचं उदाहरणं दाखवा की. मग तुमचंही म्हणणं मान्य करू. तसचं तुमच्या दोन नंबर धंद्यातलं मला जसं काहीच समजतं नाही. तसचं तुम्हालाही आमच्या या समाजसेवेतून समाधान मिळविण्याच्या स्वार्थी धंद्याचा अन्वयार्थ नाही समाजणार. 

  मान्य आहे की, पैसा हे साधन आहेच की, पण साध्य असूचं शकत नाही... राजकारणाचं म्हणाल तर, लोकांना फसवून आनंद मिळविण्यापेक्षा असमाधानी राहिलेलं परवडलं. मित्रांनाही फसविणारं राजकारण करण्यापेक्षा निवडून न येता समाजसेवेचं समाधानही कित्येक पटींनी बेस्टचं..."

  मदत करण्याऐवजी दुस-यांच्या दु:खात आनंद मानणारे असे मित्र नेमके कोणाचे 'मित्र' असतात का, हाच प्रश्न मला आता पडतोय. सामाजिकदृष्ट्या 'चांगलं' म्हणजे नेमकं काय? शेतकरी संघटनेच्या आंदोलनासाठी निमंत्रण देण्यासाठी गेल्यानंतर जवळच्या 'मित्रां'नी शिकविलेलं 'जीवनाचं तत्व' इतरांनाही समजून सांगण्याचा हा साधा हेतू. बाकी काहीच नाही. कारण जीवनात 'अर्था'ऐवजी अन्वयार्थाला महत्व देण्याचं मला मनोमन पटलंय... बाकी याचा ज्याला जो अर्थ लावायचाय त्यानेही तोच लावावा... कारण चष्म्याचा नंबर एक आहे की 'दोन' यावरच ठरणार आहे संबंधितांचा अन्वयार्थ...!!!

  - सचिन मोहन चोभे (लेखक मुक्त पत्रकार व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत)

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad