728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कोपर्डी खटला : वकिलांच्या गैरहजेरीमुळे आरोपीला १० हजारांचा दंड


अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी खटल्यात बचाव पक्षाचे साक्षीदार रविंद्र चव्हाण व आरोपी संतोष भवाळचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे हे बुधवारी सुनावणीला न्यायालयात अनुपस्थित राहिले. चव्हाण यांच्या वतीने मुंबईत मुसळधार पावसात अडकल्याने, तर अॅड. खोपडे यांच्या वतीने सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात येऊ शकत नसल्याचे अर्ज सादर करण्यात आले. शहानिशा केल्यानंतर खोपडे यांनी न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचे कोर्टाच्या लक्षात आले. त्यामुळे कोर्टाने आरोपी भवाळला १० हजार रुपयांचा दंड केला. तसेच अॅड. खोपडे यांच्या सुरक्षेबाबत एसपींना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

जिल्हा व सत्र न्यायालयात कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकार पक्षाचे काम पहात आहेत. बुधवारी बचाव पक्षाचे साक्षीदार रविंद्र चव्हाण यांची साक्ष होती. मात्र, मुंबईच्या मुसळधार पावसात अडकल्याने न्यायालयात येऊ शकत नसल्याचा अर्ज त्यांच्या वतीने करण्यात आला. तर आरोपी भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याचा अर्ज न्यायालयापुढे आला. संतोषच्या भावानेच हा अर्ज सादर केला होता.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा  Twitter वर फॉलो करा. 

रविंद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल करुन घेत न्यायालयाने त्यांच्या सुनावणीसाठी ४ सप्टेंबरची तारिख निश्चित केली. तर अॅड. खोपडे यांच्या अर्जावर पोलिसांचे म्हणणे मागवले. डीएसबीचे पीआय अविनाश मोरे यांनी न्यायालयात म्हणणे सादर केले. खोपडे यांना पोलिस सरंक्षण दिलेले आहे. पुणे जिल्ह्यात पुण्याचा, तर नगर जिल्ह्यात नगरचा कर्मचारी त्यांच्यासोबत असतो, अशी माहिती त्यांनी दिली.

बुधवारी सकाळी पुण्याचा पोलिस खोपडेंच्या घराबाहेर त्यांची वाट पहात होता. शिरुरच्या हद्दीवर नगरचा पोलिस उभा असल्याचेही अर्जात म्हटले होते. दोन्ही कर्मचाऱ्यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीला तशा नोंदी केल्याचेही न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे आरोपीच्या वकिलांच्या वतीने केलेल्या अर्जात चुकीची माहिती देवून न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले.

न्यायालयाने आरोपी संतोष भवाळ व त्याचा भाऊ बाळू यांच्याकडेही विचारणा केली. मात्र, संतोषने काहीही माहित नसल्याचे सांगितले. तर बाळूने वकिलांनी फोन करुन जे सांगितले, तेच अर्जात म्हटले, असे सांगितले. आरोपीच्या वकिलांच्या अर्जात खोटी माहिती असल्याचे मत नोंदवत न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. वकिलांच्या गैरहजेरीबद्दल आरोपीला १० हजार रुपयांचा दंड केला. अॅड. खोपडे यांच्या सुरक्षेबद्दल चौकशी करुन ४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले.

पोलिसाला हीन वागणूक - आरोपीचे वकील बाळासाहेब खोपडे यांना पोलिस सरंक्षण दिलेले आहे. मात्र शेख नावाच्या सुरक्षारक्षकाला त्यांनी बंगल्याच्या खाली थांबायला लावले. मला तुझी गरज नाही, असे म्हणत खोपडेंनी आपल्याला हाकलून दिले, अशी नोंद सुरक्षारक्षकाने हडपसर पोलिस स्टेशन डायरीत नोंदवली आहे. हीन वागणूक देवूनही आपण आपले कर्तव्य पार पाडले व नंतर ड्युटी संपल्यावरच निघून आलो, असेही त्याने म्हटले आहे. ही माहितीही पोलिसांच्या वतीने बुधवारी न्यायालयात देण्यात आली.
त्यांना वॉरंट काढा - आरोपी पक्षाचे एकमेव साक्षीदार रविंद्र चव्हाण हे सलग दुसऱ्या वेळी न्यायालयात सुनावणीला गैरहजर राहिले. गेल्या वेळी त्यांनी वैद्यकीय कारण दिलेले होते. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. यावेळीही त्यांनी मुंबईतील मुसळधार पावसात अडकल्याचे कारण सांगितले. सुनावणी आणखी लांबणीवर पडू नये म्हणून चव्हाण यांच्या नावे वॉरंट काढण्याची मागणी अॅड. उज्वल निकम यांनी केली. मात्र, न्यायालयाने साक्षीदारला अखेरची संधी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
म्हणून आहे सुरक्षा - कोपर्डी खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना आधीपासूनच झेड प्लस सुरक्षा आहे. कोपर्डी खटल्यातील आरोपींवर न्यायालयात दोन-तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी तर बीडच्या काही युवकांनी आरोपींवर प्राणघातक हल्ला केला. तेव्हापासून न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात झाला. तसेच मागणी नसूनही आरोपींच्या वतीने काम पाहणाऱ्या तिन्ही वकिलांना पोलिस सरंक्षण देण्यात आले.
यापूर्वीही केलाय दंड - आरोपी संतोष भवाळ याचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे यापूर्वीही न्यायालयात दोनदा गैरहजर राहिले. त्याबद्दल भवाळला दोनदा आर्थिक दंड करण्यात आला. हा दंड भरणार नसल्याचे आरोपीने स्पष्ट केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तो दंड वसूल करावा, असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. बुधवारी पुन्हा आरोपीचे वकील गैरहजर होते. त्यामुळे पुन्हा आरोपी भवाळ याला दंड करण्यात आला.
ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कोपर्डी खटला : वकिलांच्या गैरहजेरीमुळे आरोपीला १० हजारांचा दंड Rating: 5 Reviewed By: DNA Live24