728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

निंबोडीत वर्गखोली कोसळून तीन विद्यार्थी ठार


अहमदनगर । DNA Live24 - निंबोडी (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पाचवी "अ'च्या वर्गखोली स्लॅब कोसळून त्याखाली सुमारे ३३ विद्यार्थी गाडले गेले. त्यापैकी तिघांना मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी दुपारी पावणे पाचच्या सुमारास घडली. जखमी विद्यार्थ्यांवर जिल्हा रुगणालयात व काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोसळलेली इमारत ग्रामपंचायत निधीतून वीस वर्षांपूर्वी बांधलेली होती. इमारतीचा स्लॅब दुसऱ्यांदा कोसळल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

निंबोडीत जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी शाळा आहे. शाळेतील प्रत्येक इयत्तेच्या वर्गखोल्या वेगवेगळ्या होत्या. सोमवारी सायंकाळी शाळा सुटायला दहा मिनिटे बाकी असताना, इयत्ता पाचवी अच्या वर्गाचा स्लॅब कोसळला. वर्गात हजर असलेल्या ३५ विद्यार्थीपैकी पाऊस असल्याने २-३ मुले पालकांनी दुपारीच घरी नेली होती. त्यामुळे वर्गात ३३ मुले होती. वर्गशिक्षिका लीना पाटील याही वर्गातच होत्या.


अचानक वर्गाची मागची बाजू खचली व स्लॅबसह खोली कोसळली. वर्गातील सर्व विद्यार्थी स्लॅबखाली गाडले गेले. वर्गशिक्षिका पाटीलही जखमी झाल्या. इतर शिक्षकांनी मदतकार्यासाठी आरडाओरडा केला. स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले. तातडीने मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. जेसीबीच्या साह्याने स्लॅबचा कोसळलेला भाग बाजूला काढण्यात आला. जसे विद्यार्थी बाहेर निघाले, तसे त्यांना रुग्णालयात हलवण्यात येत होते. इतर विद्यार्थी प्रथमोपचार करुन घरी पाठवण्यात आले.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय किशोरकुमार परदेशी व सहकारी, आरसीपी प्लाटूनच्या २२ महिला व २० पुरुष तत्काळ मदतकार्याला लागले. एसपी रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील, नगर ग्रामीणचे डीवायएसपी आनंद भोईटे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. अनंत कोल्हे, तहसीलदार सुधीर पाटील घटनास्थळी आले. तोफखाना, कोतवाली पोलिसही मदतकार्यासाठी आले. पंचायत सभापती रामदास भोर, हेही आले. 


इयत्ता पाचवी अचा वर्ग नदीच्या कडेला होता. नदीच्या बाजूचा भाग अगोदर खचला. त्यानंतर इमारत संपूर्ण खाली कोसळली. शेजारीच मंडप टाकण्याचे काम सुरु होते. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यामुळेच शाळा कोसळल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊनही जखमींची विचारपूस केली.
मृत विद्यार्थ्यांची नावे - श्रेयस प्रविण रहाणे, सुमित बाळू भिंगारदिवे, वैष्णवी प्रकाश पोटे.
जखमी विद्यार्थ्यांची नावे - गौरव कृष्णा वाघुले, मंथन उमेश साठे, आरती विजय निंबाळकर, कश्यप नजीर शेख, प्रज्वल सुशांत भिंगारदिवे, प्रथम अशोक पवार, संचिता अशोक भिंगारदिवे, शरद शिवाजी राठोड, मानसी महादेव भिंगारदिवे, गणेश संजय एकशिंगे, अनिकेत सुभाष साठे, नेट संजय वैरागर, व शिक्षिका लिना सुभाषचंद्र पाटील.
ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: निंबोडीत वर्गखोली कोसळून तीन विद्यार्थी ठार Rating: 5 Reviewed By: DNA Live24