728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

36 तासांनी आढळली मुळा कालव्यात पडलेली विवाहिता


नेवासे । DNA Live24 - पतीसोबत देवदर्शनासाठी आलेल्या अश्विनी अजय मुळे (वय २२, रा. हडपसर, पुणे) ही महिला सोमवारी रात्री नगर औरंगाबाद महामार्गावर घोडेगावात मुळा कालव्यात पडली. तब्बल ३६ तासांनंतर तिचे प्रेत बालाजी देडगाव शिवारात ग्रामस्थांना आढळले. कालव्यावर असलेल्या पुलाच्या कठड्यावर रेलत असताना ती तोल जाऊन पडल्याचे तिच्या पतीचे म्हणणे आहे. सोनई पोलिस व स्थानिक युवक तिला शाेधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.

अश्विनी गृहिणी असून तिचा पती अजय जीममध्ये कामाला आहे. दोघे जण शुक्रवारी दुपारी हडपसरहून बसने शिर्डीला गेले. दोन दिवस त्यांनी तेथेच मुक्काम केला. देवदर्शन केल्यानंतर शिर्डीतच ते राहिले. सोमवारी सकाळी ते शनिशिंगणापूरला आले. दुपारी पाच वाजेच्या सुमारास दर्शन आटोपून ते घोडेगावात आले. सायंकाळी घोडेगाव चौफुल्यावर त्यांनी जेवण केले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोघेही चौकाजवळ असलेल्या कालव्याच्या पुलावर ते गेले.

काही वेळातच अजय एकटाच चौफुल्यावर आला. अश्विनी पुलाच्या कठड्यावर बसायला लागली असता तोल जाऊन पाण्यात पडली, असे त्याने नागरिकांना सांगितले. स्थानिकांनी या घटनेची माहिती सोनई पोलिसांना कळवली. सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे व सहकारी तत्काळ घटनास्थळी आले. पोलिस पाटील भगत वैरागर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर बर्डे, लखन भोसले, सचिन कुऱ्हाडे, आदी युवकांनी पाण्यात उड्या मारुन अश्विनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

अश्विनी व अजयचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला होता. तिचे माहेर उस्मानाबादचे असून अजयसोबत तिची पुण्यात ओळख झाली होती. नंतर दोघांनी विवाह केला. ती कॅनॉलमध्ये पडल्याचे समजल्यानंतर तिचा भाऊ, त्याचे काही मित्र व अजयचा भाऊही घोडेगावात दाखल झाले होते. सोनई पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला मिसिंगची नोंद घेतली होती. नंतर याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
शर्थीचे प्रयत्न - सोमवारी रात्रभर युवकांनी पाण्यात पोहूनही अश्विनी सापडली नाही. सोमवारचा दिवस व पुढील रात्रही तशीच गेली. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिचे प्रेत भेंडे शिवारात कॅनॉलमध्ये तरंगत असल्याने काही नागिरकांनी पाहिले. ही बाब समजल्यानंतर पोलिस व नागरिकांनी तेथे धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने अश्विनीचे प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले. नेवासे येथे तिचे शवविच्छेदन करण्यात आले. सोनई पोलिस व स्थानिक युवकांनी ३६ तास तिच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 36 तासांनी आढळली मुळा कालव्यात पडलेली विवाहिता Rating: 5 Reviewed By: DNA Live24