Header Ads

 • Breaking News

  पोलिसांना सायबर गुन्हे तपासाचे मार्गदर्शन


  अहमदनगर । DNA Live24 - जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रत्येकी एक सहायक पोलिस निरीक्षक व फौजदाराला नुकतेच सायबर गुन्ह्यांच्या तपासाचे प्रशिक्षण देण्यात आले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक कार्यालयात नुकताच या तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला.

  जिल्ह्यात घडणाऱ्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, तसेच घडणारे गुन्हे तत्काळ उघडकीस यावेत, तक्रारदारांना त्यांचे गेलेले पैसे परत मिळावेत, या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये नोंदवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांबाबत अॅड. गजेंद्र फुंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या विविध शंकांचे निरसनही केले.

  मोबाईल सायबर फॉरेंसिक बाबत सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी मार्गदर्शन केले. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याची फिर्याद कशी घ्यायची, गुन्ह्याच्या फिर्यादीत कोणत्या गोष्टी अंतर्भूत असणे आवश्यक आहे, गुन्ह्याबाबत माहिती मागवून गुन्हा कसा उघडकीस आणावा, याची सखोल माहिती सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी दिली.

  या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांचे एकूण ६० पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. प्रशिक्षणार्थींनी कार्यशाळा समारोपाच्या वेळी मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यशाळेत घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करुन जिल्ह्यात सायबरचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याची ग्वाही दिली. यावेळी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

  Post Top Ad

  Post Bottom Ad