728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नगरी राजकारण : शिवसेनेच्या 'अनिलभैय्यांना' भाजपकडून 'गळ'!


अहमदनगर । DNA Live24 विशेष - नगर जिल्ह्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. शिवसेनेकडून सलग २५ वर्षे आमदारकी भूषविलेल्या माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांना भाजपात येण्यासाठी गळ घालण्यात येत आहे. त्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतल्याची चर्चा असल्याने खासदार गांधी गटाची 'हवा टाईट' झाली आहे.

नगर शहराच्या राजकारणावर अनिल भैय्यांची जबरदस्त पकड आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी विरोधात असलेल्या अभय आगरकर व अनिल भैय्या राठोड यांच्यात मध्यंतरीच्या काळात सख्य निर्माण झाले आहे. नुकतेच पालकमंत्री राम शिंदे यांनी राठोड यांच्या गणेश मंडळातील आरतीला हजेरी लावली. यावेळी नगर शहरासाठी १५० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राउत, स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, सदाशिव देवगावकर, नरेंद्र कुलकर्णी, विक्रम राठोड, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.

भाजपच्या मंत्र्याने शिवसेनेच्या माजी आमदारांच्या मंडळात निधीची केलेली घोषणा सर्वकाही सांगून जात आहे. शिवसेनेतही सध्या सर्वकाही ठीक असल्याचे दिसत नाही. शिवसेनेची पालिकेवर सत्ता असताना राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने सेनेत अंतर्गत खदखद आहे. त्यामुळेच भाजपकडून राठोड यांना भाजपात येण्यासाठी गळ घालण्यात येत असल्याची चर्चा आहे. पालिकेसाठी निधी देण्यासाठी राठोड यांना भाजप प्रवेशाची अट घालण्यात आल्याचीही चर्चा आहे.

भाजपात खासदार दिलीप गांधी गटाने शहर भाजपवर कब्जा केला आहे. त्याला मध्यंतरी पालकमंत्री राम शिंदे यांचे दुर्लक्षही कारणीभूत ठरले. राज्यात लक्ष दिल्याने पालकमंत्री राम शिंदे यांचा शहर भाजपातील गट कमकुवत झाला होता. अनेक कार्यकर्तेही विखुरले गेले होते. त्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्याची खेळी खेळण्यात पालकमंत्र्यांनी सुरुवात केली आहे.

खासदार दिलीप गांधी यांना लोकसभेचे तिकीट मिळेल की नाही?, याची शाश्वती नसल्याने गांधी गट एकाकी पडला आहे. आगामी लोकसभेसाठी भाजपकडून पालकमंत्री राम शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता भाजपच्या गोटातून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मध्यंतरी सुस्तावलेला पालकमंत्र्यांचा गट कार्यरत झाला आहे. पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर समीकरणे कशी बदलतात? हे पाहणे महत्वाचे आहे.

पालकमंत्र्यांची पक्षाध्यक्ष शहांकडे तक्रार - शिवसेनेच्या माजी आमदारांच्या कार्यक्रमात पालकमंत्री राम शिंदे यांनी निधी देण्याची घोषणा केली. शहरात पक्षाचा उपमहापौर असतांना सेनेच्या कार्यक्रमात झालेली घोषणा पालकमंत्र्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाची थेट पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.

कोरगावकर - तांबे मैत्री सुसाट - मुंबईहून आलेल्या भाऊ कोरगावकर व युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. त्यांच्यामुळे सेनेत पक्षांतर्गत धुसफूस वाढल्याची चर्चा सेना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे सेनेतील जुने निष्ठावान कार्यकर्ते कोरगावकर यांच्यावर नाराज असल्याचे कळते. पूर्वी शिवालयात होणारे शिवसेनेचे सर्व निर्णय आता एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये अथवा दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या हॉटेलवर होत आहेत. त्यामुळे एकप्रकारे राठोड यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न तर सुरु नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. 

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नगरी राजकारण : शिवसेनेच्या 'अनिलभैय्यांना' भाजपकडून 'गळ'! Rating: 5 Reviewed By: DNA Live24