Header Ads

 • Breaking News

  प्राथमिक शिक्षकांच्या सभेत पुन्हा राडा !  (छाया- सचिन शिंदे)
  अहमदनगर । DNA Live24 - अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. सभेत गोंधळ घालणाऱ्या पंधरा पुरुष व तीन महिला शिक्षकांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. सभेत झालेली शिवीगाळ, शिक्षकांची अश्लील भाषा पाहता ही शिक्षकांची सभा होती का? असा सवाल निर्माण झाला आहे.

  शिक्षक बँकेमध्ये गुरुमाऊली पॅनलची सत्ता आहे. आज सकाळी ११ वाजता बँकेची सर्वसाधारण सभा नंदनवन लॉन येथे सुरु झाली़. सभा सुरु होताच आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सभा होऊ देणार नाही. असा नारा देत विरोधकांनी व्यासपीठावर जात ताबा घेतला़. बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांना विरोधकांनी पैशांचा हार घालत शिक्षक बँकेतील सॉफ्टवेअर प्रणालीत मोठा घोळ झाल्याचा आरोप केला.

  विरोधी सभासदांनी सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली़. एकमेकांना मारण्याची भाषा वापरत काही शिक्षकांनी अश्लील भाषाही वापरली़. शिक्षकांचा गोंधळ वाढतच असताना पोलिसांनी हस्तक्षेप करुन गोंधळी शिक्षकांना आवरण्याचा प्रयत्न केला़. मात्र, शिक्षकांनी पोलिसांनाही न जुमानल्याने पोलिसांनी संजय धामणे यांच्यासह सात गोंधळी शिक्षकांना ताब्यात घेतले. पुढील सभा पोलीस बंदोबस्तात सुरु ठेवण्याची वेळ सत्ताधारी मंडळावर आली़.

  सभा पुन्हा सुरु होताच विरोधकांनी सभात्याग करीत सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सात शिक्षकांना कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले़. त्यांना सोडविण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

  Post Top Ad

  Post Bottom Ad