Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

निंबोडी दुर्घटना : मुख्याध्यापिका, बीडीओ, केंद्रप्रमुखाविरुद्ध गुन्हा


अहमदनगर । DNA Live24 - निंबोडी (ता. नगर) येथील शाळेचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाला. या घटनेत दगावलेल्या वैष्णवी पोटेचे वडील प्रकाश मोहन पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केंद्रप्रमुख भोर, गटशिक्षण अधिकारी रामदास हराळ, गटविकास अधिकारी वसंत गारुडकर, मुख्याध्यापिका निर्मला वसंत दातीर, बांधकाम करणारे तत्कालीन ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निंबोडी दुर्घटनेत त्यांच्या मुलीसह तीन बालकांचा मृत्यू झाला. तर १८ बालके जखमी झाली. पडलेल्या शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते. मुळात जो वर्ग पडला तो आधी स्टोअर रुम म्हणून वापरला जात होता. स्वातंत्र्यदिनानंतर तेथे वर्ग भरवायला सुरूवात झाली. वर्गखोल्यांची परिस्थिती पाहण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख भोर साहेब, गटशिक्षणाधिकारी हराळ, गटविकास अधिकारी गारुडकर व मुख्याध्यापिका दातीर यांच्यावर होती.

पाहणी करुनही या अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. केव्हाही पडेल अशा अवस्थेत असलेल्या वर्गात मुलांना बसवले. या सर्व अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली. त्यामुळे मुलांच्या बळी जाण्याला या अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, असे पोटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार भिंगार पोलिसांनी याप्रकरणी निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवला. सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कवडे हे करीत आहेत. आरोपींना लवकर अटक करण्याची मागणीही फिर्यादीने केली अाहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages