728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

काेपर्डी खटला : बचाव पक्षाचे साक्षीदार चव्हाणांची उलटतपासणी पूर्ण


अहमदनगर । DNA Live24 - पेपरमध्ये कोपर्डी घटनेची पहिली बातमी वाचल्यापासून आपण या प्रकरणावर लक्ष ठेवून होतो. विविध माध्यमांतून या प्रकरणाचे "ट्रॅकिंग' करत होतो. कोपर्डी येथील पीडित मुलीच्या कुटुंबियांना मी कधीही भेटलो नाही. मात्र, आरोपी संतोष भवाळचा भाऊ मला येऊन भेटल्यापासून त्याच्या संपर्कात आहोत. सरकारी वकील उज्वल निकम व कोपर्डी खटल्याबद्दल माहितीच्या अधिकारात माहितीही मिळवली होती, अशी कबुली बचाव पक्षाचे साक्षीदार रविंद्र चव्हाण यांनी दिली. त्यांची उलटपासणी शनिवारी पूर्ण झाली. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी तब्बल साडेतीन तास त्यांची उलटतपासणी घेतली.

शनिवारी सकाळी साडे अकराला चव्हाण यांची उर्वरित उलटतपासणी सुरू झाली. गेल्या वेळी दाखवलेल्या एका वृत्तवाहिनीच्या व्हिडिओत अॅड. निकम यांनी 'मराठा' हा शब्द कोठेही उच्चारलेला नाही, मराठा मोर्चाच्या मागण्यांचाही त्यात उल्लेख नाही. मात्र व्हिडिओत 'मराठा मोर्चे' हे सबटायटल कोणी घुसवले, हे माहिती नसल्याचे चव्हाण म्हणाले. बहुजन क्रांती मोर्चाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर कामगार नेते अनंत लोखंडे यांना ओळखत असल्याची कबुली त्यांनी दिली.

भय्युजी महाराज यांनी अॅड. निकम यांच्या जळगावातील घरी दिलेल्या भेटीचा, कोपर्डी प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिलेल्या निवेदनाचा व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा, असे तीन व्हिडिओ न्यायालयात दाखवण्यात आले. त्या अनुषंगाने अॅड. निकम यांनी चव्हाणांवर प्रश्नांची सरबत्ती केली. या तिन्ही व्हिडिओत अॅड. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे दोषारोपपत्र तयार केल्याचा कोठेही उल्लेख नसल्याचे, व्हिडिओंच्या सत्यतेबद्दल कोणतीही शहानिशा केली नसल्याचे चव्हाण यांनी कबूल केले.

कोपर्डी खटल्यात बचाव पक्षाच्या वकिलांनी दिलेले व्हिडिओ संपादित केलेले आहेत. ते खरे असल्याचे काेणतेही प्रमाणपत्र बचाव पक्षाने सादर केले नाही. किंवा ते मिळवलेही नाहीत, सुनावणीला गैरहजर राहताना बचाव पक्षाचे साक्षीदार रविंद्र चव्हाण यांनी न्यायालयात खोटे कारण सांगितले, आजही ते न्यायालयात खोटी साक्ष देत असल्याचे आरोप विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केले. तर चव्हाण यांनी त्यांचा इन्कार केला. या खटल्यात दोन्ही पक्षांचे साक्षीपुरावे पूर्ण झाले आहेत. पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होणार असून अॅड. निकम हे सरकार पक्षातर्फे अंतिम युक्तीवाद करतील.

'खैरलांजी'चा रिपोर्ट - खैरलांजी येथील दलित हत्याकांड झाले, त्यावेळी आपण बार्टीचे डायरेक्टर होतो. त्यामुळे त्या घटनेबद्दल आपण शासनाला दोन अहवाल दिले होते. खैरलांजी गावाला भेटही दिली होती, अशी कबुली साक्षीदार चव्हाण यांनी दिली. खैरलांजीचा खटलाही निकम यांनी चालवला होता. त्यात आरोपींना फाशी झाली होती. किती जणांना ते आठवत नाही, पण हायकोर्टात गेल्यानंतर आरोपींची शिक्षा रुपांतरीत झाल्याचे नंतर पेपरात वाचले, असेही चव्हाण यांनी नमूद केले. मात्र हायकोर्टात अॅड. निकम हजर झाले नव्हते, त्या रागातून आपल्याला त्यांचा आकस असल्याचे चुकीचे असल्याचेही चव्हाण म्हणाले.

आकस व द्वेष - बचाव पक्षाने महत्वाचे पुरावे म्हणून दिलेले व्हिडिओ सत्य असल्याचे काेणतेही प्रमाणपत्र नाही. व्हिडिओंची संबधित वाहिन्यांकडून, विश्वासार्ह यंत्रणेकडून शहानिशा केलेली नाही. तीन व्हिडिओंमध्ये केवळ उज्वल निकम यांचा नामोल्लेख आहे. त्यामुळे अॅड. निकम यांच्याबद्दल आकस व द्वेष असल्यानेच बचाव पक्षाने व्हिडिओ दिले. ते संपादित व बनावट असल्याचा आरोप अॅड. निकम यांनी केला. 

पुराव्यांमध्ये तफावत - बचाव पक्षाने न्यायालयात दिलेल्या चारपैकी दोन व्हिडिओंचे स्क्रीप्ट (लिखित रुपांतर) सोबत जोडले होते. त्यात तफावत असल्याचे अॅड. निकम यांनी निदर्शनास आणून दिले. व्हिडिओत नसलेली वाक्ये, संवाद व संदर्भ लिखित रुपांतरात जाणीवपूर्वक घुसवल्याचा आरोप अॅड. निकम यांनी केला. ही तफावत कशामुळे झाली, असे विचारले असता ती मुद्रितलेखकाची चूक असू शकते, असे चव्हाण म्हणाले.

तो मी नव्हेच - मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्या तोंडी अॅड. निकम यांची नियुक्ती केली, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच गुन्ह्याचे दोषारोपपत्र बनवले, असे बचाव पक्षाने अर्जात म्हटले होते. पण, वारंवार व्हिडिओ पाहूनही त्यात निकम यांच्या मार्गदर्शनाखाली दोषारोपपत्र तयार केल्याचा उल्लेख दिसला नाही. रविंद्र चव्हाणांनाही तो दाखवता आला नाही. "अॅड. निकमसारखे' वकील नेमू, असा उल्लेख होता. पण, निकमांसारखे म्हणजे निकम नव्हेत, असे स्पष्टीकरण सरकार पक्षातर्फे देण्यात अाले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: काेपर्डी खटला : बचाव पक्षाचे साक्षीदार चव्हाणांची उलटतपासणी पूर्ण Rating: 5 Reviewed By: DNA Live24