728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कोपर्डी खटला : आरोपीच्या भावाने मागितली होती रविंद्र चव्हाणांकडे मदत


अहमदनगर । DNA Live24 - आरोपी संतोष भवाळचा भाऊ बाळू याने आपल्याकडे आर्थिक व कायदेशीर मदत मागितली होती. त्याने होऊन आपल्याशी संपर्क केला. त्यामुळे अनेक जणांसोबत चर्चा करुन आपण यु-ट्युबवरुन तीन व्हिडिओ डाऊनलोड केले. त्यांच्या सीडी त्याला तयार करुन दिल्या, अशी कबुली बचाव पक्षाचे साक्षीदार तथा यशदाचे माजी अधिकारी रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी न्यायालयात दिली. त्यांची सरतपासणी सकाळच्या सत्रात पूर्ण झाली. मात्र, पाय दुखत असल्याचे कारण देऊन त्यांनी विनंती केल्यामुळे तब्बल पावणे दोन तास चाललेली त्यांची उलटतपासणी स्थगित झाली.

अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी बचाव पक्षातर्फे रविंद्र चव्हाण यांची सरतपासणी घेतली. कोपर्डीसंदर्भात आपण यु ट्युबवर काही वृत्तवाहिन्यांच्या बातम्या पाहिल्या. त्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण, उज्वल निकम व भय्युजी महाराज यांच्या भेटीबद्दलची बातमी व विनोद तावडे यांनी दिलेल्या मुलाखतीचे व्हिडिओ होते. ते डाऊनलोड करुन आपण त्याच्या सीडी बनवल्या. आरोपी संतोष भवाळच्या भावाला त्या दिल्या. या व्हिडिओंमध्ये अॅड. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे दोषारोपपत्र तयार केल्याचे म्हटलेले असल्याचे ते म्हणाले.

विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी पावणे दोन तास चव्हाणांची उलटतपासणी घेतली. उलटतपासणीत त्यांनी संगणक शास्त्राची कोणतीही पदवी घेतली नसल्याचे, फक्त एमएससीआयटी कोर्स केलेला असून संगणकाचे जुजबी ज्ञान असल्याचे सांगितले. युट्युबवर व्हिडिओ कसे, कोठून अपलोड करायचे, ते कोण करते, याबद्दल निकम यांनी त्यांना प्रश्न विचारले. व्हिडिओचे सत्यता प्रमाणपत्र युट्युब देत नसल्याचे मान्य करीत आपणही तसे प्रमाणपत्र घेतले नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कोर्टात दिलेले व्हिडिओ खरे कसे, याचा कोणताही पुरावा आपल्याकडे नसल्याचे चव्हाण म्हणाले.

आरोपी संतोष भवाळचा भाऊ बाळू आपल्याकडे आला. त्याने आपल्याला आर्थिक व कायदेशीर स्वरुपाची मदत मागितली. त्याला कधी आर्थिक मदत केल्याचे आता आठवत नाही. पण, त्याने व्हिडिओंची सीडी बनवून देण्याची विनंती केली होती. त्यामुळे आपण त्याला सीडी बनवून दिली. नेमक्या कोणत्या सीडी हव्यात, हे त्याने आपल्याला सांगितले नव्हते. त्यामुळे सीडीत कोणते व्हिडिओ द्यायचे, हा निर्णय अनेक लोकांसोबत चर्चा करुन घेतल्याचे चव्हाण म्हणाले. तसेच आरोपी भवाळसाठी माहिती अधिकारात आपण काही माहिती गोळा केल्याचेही ते म्हणाले.

अॅड. बाळासाहेब खोपडेंचे बंधू यशदात व्याख्यानाला येत, तेव्हापासून त्यांच्याशी ओळख आहे. कोपर्डी प्रकरणानंतर अॅड. खोपडेंच्या सतत संपर्कात होतो. या व्हिडिओंबद्दल खोपडेंसोबत चर्चा करावी वाटल्याचेही चव्हाण यांनी कबूल केले. हे व्हिडिओ कोर्टात द्यावेत, असे खोपडेंना मी नंतर बोललो, अशी कबुली त्यांनी दिली. व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याची गरज वाटली नाही, संबंधित चॅनल्सकडून बातम्यांचे मूळ व्हिडिओ मिळवणे शक्य होते, मात्र तसे केले नाही, असेही चव्हाण उलटतपासणीत म्हणाले.

यशदात नोकरीला असताना ब्रेन बँक पुणे या स्वयंसेवी संस्थेशी निगडित होतो, वाई (जि. सातारा) येथील एसबीआय बँकेत या संस्थेचे खाते आहे. त्यातून १२ लाख रुपये आपण स्वत:च्या खात्यात वर्ग केले, असे त्यांनी कबूल केले. हे खाते यशदात नोकरीला असतानाच उघडल्याचे ते म्हणाले. त्यासाठी परवानगी घेतल्याचे, अाठवत नाही, असे चव्हाण म्हणाले. ही संस्था नोंदणीकृत नसून तिला धर्मादाय आयुक्तांची परवानगी नसल्याचे त्यांनी कबूल केले. यशदाने दिलेले सिमकार्ड वापरतो, ते नंतर स्वत:च्या नावावर केले. त्याचे बिल लहान भावाच्या मालकीची कंपनी भरते, अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.

'व्हिडिओ'ची सत्यता काय? - अॅड. निकम मोर्चाबद्दल बोलताना ५६ सेकंदाचा एक व्हिडिओ कोर्टात प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला. त्यात निकम यांच्या तोंडी कोठेही "मराठा' हा शब्द नाही. व्हिडिओत त्यांना प्रश्न विचारणारा निवेदक किंवा तसा प्रश्नही दाखवलेला नाही. "मराठा समाजाचे मोर्च देशाला मार्गदर्शक' हे वाक्य निकम यांच्या तोंडी नाही. केवळ तशी अक्षरे असलेली पट्टी स्क्रीनवर दिसते. तसेच निकम यांनी कोपर्डी घटनेबद्दल काहीही वक्तव्य केलेले नाही. संबंधित चॅनलकडून मूळ व्हिडिओही चव्हाण यांना मिळवला नाही. त्यामुळे हा व्हिडिओ संपादित केलेला आहे, असा मुद्दा अॅड. निकम यांनी उलटतपासणीत मांडला.

अर्धवट उलटतपासणी - उलटतपासणी सुरू असताना साक्षीदार रविंद्र चव्हाण हे वारंवार त्यांचा पाय दुखत असल्याचे कारण सांगत होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना बसायला खुर्ची देण्याची सूचना केली. खुर्ची दिल्यानंतरही प्रश्नांची उत्तरे देताना चव्हाण उठून उभे रहायचे. व्हिडिओच्या सत्यतेबद्दल प्रश्नोत्तरांची जुगलबंदी रंगल्यानंतर आपल्या पायाला सूज आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयात डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. मात्र रक्तदाब तपासणीला व गोळ्या द्यायला चव्हाण यांनी नकार दिला. सुनावणी पुढे ढकला, अशी विनंती केली. त्यामुळे अखेर त्यांची उलटतपासणी स्थगित करण्यात आली. पुढील सुनावणी १६ सप्टेंबरला आहे.

आमचे Facebook पेज लाईक करा व Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कोपर्डी खटला : आरोपीच्या भावाने मागितली होती रविंद्र चव्हाणांकडे मदत Rating: 5 Reviewed By: DNA Live24