728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

आमदार शिवाजी कर्डिलेंच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान


अहमदनगर । DNA Live24 - बहुचर्चित अशोक लांडे खून प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेले आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले आहे. या खटल्यातील मूळ फिर्यादी शंकर राऊत यांनी हे अपिल केले आहे. उच्च न्यायालयात क्रिमिनल अपिल दाखल करण्यासाठी राऊत यांनी उशीरमाफीचा अर्ज केला होता. हा अर्ज दोन आठवड्यांपूर्वी मंजूर झाला असल्यामुळे आता आमदार कर्डिले यांच्याविरुद्ध अपिल चालणार आहे.

सन २००८ मध्ये लॉटरी विक्रेता युवक अशाेक लांडे याचा केडगावातील म्हसोबा चौकामध्ये मारहाणीत खून झाला होता. या गुन्ह्यात काँग्रेसचा तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर, त्याचे भाऊ अमोल व सचिन कोतकर यांना आरोपी केलेले होते. सुरूवातीला आरोपींनी हे प्रकरण मोटार अपघाताचे भासवले. राजकीय पदाचा वापर करुन आमदार कर्डिले यांनी यात महत्वाची भूमिका बजावली, असे राऊत यांच्या वतीने केलेल्या अपिलात नमूद केलेले आहे.

लांडेचा खून दडपण्यासाठी भानुदास कोतकर व त्याचा व्याही आमदार कर्डिले शेवगावला जाऊन अशोकच्या नातेवाईकांना काही रक्कम देवून गप्प रहायला सांगितले. त्याबद्दलचे साक्षीदारही उपलब्ध आहेत. मात्र, त्यापैकी काही साक्षीदार नाशिकच्या कोर्टात फितूर झाले. त्यामुळे एप्रिल २०१६ मध्ये या खटल्याचा निकाल लागला. त्यात आमदार कर्डिले यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. या सुटकेविरुद्ध आता राऊत यांनी क्रिमिनल अपील केले आहे. त्यासाठी उशीरमाफीचा अर्जही केला होता.

१८ ऑगस्टला उशीरमाफीचा अर्ज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी मंजूर केला. त्यामुळे आता आमदार कर्डिले यांच्याविरुद्ध अपिल चालणार आहे. या अपिलासाठी फिर्यादी राऊत यांच्या वतीने अॅड. जितेंद्र गायकवाड, अॅड. पंकज पांडे, तसेच ज्येष्ठ विधीज्ञ अनिलकुमार पाटील हे काम पाहणार आहेत. या खटल्यात भानुदास कोतकर, संदीप कोतकर, अमोल कोतकर व सचिन कोतकर सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: आमदार शिवाजी कर्डिलेंच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान Rating: 5 Reviewed By: DNA Live24