Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

कोपर्डी प्रकरण : अॅड. खोपडेंच्या सुरक्षेची पोलिस चौकशी सुरू


अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी खटल्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी संतोष भवाळ याचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे यांच्या सुरक्षेबद्दल चौकशी सुरू झाली आहे. खोपडे बुधवारी खटल्याच्या सुनावणीला अनुपस्थित राहिले होते. सुरक्षारक्षक नसल्याने सुनावणीला येऊ शकत नसल्याचे कारण त्यांच्या वतीने देण्यात आले. मात्र, हे कारण खोटे असल्याचे शहानिशा केल्यानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाने आरोपी पक्षाचा अर्ज फेटाळून अॅड. खोपडे यांच्या सुरक्षेची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिलेले आहेत.

कोपर्डी खटल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना आधीपासूनच झेड सुरक्षा आहे. या खटल्यातील आरोपींवर न्यायालयात दोन-तीनदा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. काही महिन्यांपूर्वी बीडच्या युवकांनी आरोपींवर प्राणघातक हल्ला केला. तेव्हापासून न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात झाला. काही सामाजिक संघटनांच्या मागणीनंतर आरोपींचे काम पाहणाऱ्या तिन्ही वकिलांना पोलिसांनी सरंक्षण दिले.

आरोपीचे वकील बाळासाहेब खोपडे यांनाही सरंक्षण आहे. मात्र काही दिवसांपूर्वी शेख नावाच्या सुरक्षारक्षकाला त्यांनी बंगल्याच्या खाली थांबायला लावले. मला तुझी गरज नाही, असे म्हणत खोपडेंनी आपल्याला हाकलून दिले, अशी नोंद सुरक्षारक्षकाने हडपसर पोलिस स्टेशन डायरीत नोंदवली. हीन वागणूक देवूनही आपण कर्तव्य पार पाडले व ड्युटी संपल्यावर निघून आलो, असे त्याने म्हटले. ही माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

आरोपी पक्षाचे साक्षीदार रविंद्र चव्हाण सलग दुसऱ्या वेळी सुनावणीला गैरहजर राहिले. गेल्या वेळी त्यांनी वैद्यकीय कारण दिले. तर यावेळी त्यांनी मुंबईतील मुसळधार पावसात अडकल्याचे कारण सांगितले. सुनावणी आणखी लांबणीवर पडू नये म्हणून चव्हाण यांच्या नावे वॉरंट काढण्याची मागणी अॅड. उज्वल निकम यांनी केली. मात्र, न्यायालयाने साक्षीदारला अखेरची संधी देत असल्याचे स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages