728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सुरेश वाडकर यांना स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार


नगर : DNA Live 24-
थिंक ग्लोबल फौंडेशनचा दुसरा “स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार (२०१७)” सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला असल्याची घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत आज केली.

वाडकर यांनी आजवर हिंदी सिने संगीत, मराठी चित्रपट संगीत, भावसंगीत, भक्ती संगीत तसेच हिंदुस्तानी शास्रीय संगीतात दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी त्यांची पुरस्कार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. रोख रुपये ५१०००, सन्मान चिन्ह, मानपत्र असे  पुरस्काराचे स्वरूप आहे. जेष्ठ दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज पुरस्काराची घोषणा करण्यात आली.  पत्रकार परिषदेस शिल्पकार प्रमोद कांबळे, सीए राजेंद्र काळे, गायक पवन नाईक, मनपाचे माजी शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, चित्रपट निर्माते श्रीपाद दगडे, फौंडेशनचे पदाधिकारी स्वप्निल पाठक आदी यावेळी उपस्थित होते.

स्व. अमरापूरकर हे नगरचे भूषण होते. त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर हिंदी व मराठी नाट्य, चित्रपट क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे नाव व कार्य कायम स्मरणात राहावे व त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती – संस्था यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करावे, याहेतूने मागील वर्षापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.

७ ऑगस्ट १९५५ ला जन्म झालेल्या वाडकरांचे कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली हे मूळ गाव. मुंबईतील गिरणी कामगाराचा मुलगा ते लोकप्रिय गायक असा वाडकरांचा प्रवास थक्क करणारा आहे. १९७६ च्या सूर सिंगार या त्यावेळच्या गाजलेल्या स्पर्धेतून विजेता ठरलेल्या वाडकरांचा सुरेल आवाज आणि तयार गळा पहिल्यांदा रसिकांना ऐकायला मिळाला. संगीतकार रवींद्र जैन हे त्या स्पर्धेचे परीक्षक होते. जैन यांनी आपल्या पहेली (१९७७) या हिंदी चित्रपटातून त्यांना पहिल्यांदा लॉंच केले. त्यानंतर  वाडकरांनी  कधी मागे वळून पाहिले नाही.

जेव्हा भारतरत्न लता मंगेशकर यांनी वाडकरांना पहिल्यांदा ऐकले तेव्हा त्या या मराठमोळ्या गायकाच्या गॉडफादर म्हणून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. लक्ष्मिकांत-प्यारेलाल, खय्याम, कल्याणजी-आनंदजी अशा त्या वेळच्या अनेक दिग्गज संगीतकारांना स्वतः फोन करून वाडकरांना ब्रेक देण्यासाठी लता दिदींनी शिफारस केली.

गायक मुकेश यांच्या निधना नंतर राज कपूर यांनी ‘सुरेश हाच आता माझा मुकेश आहे आणि हाच आता आरके बॅनरच्या नायकांसाठी पार्श्वगायन करेल’ असे जाहीर केले. झालेली तसेच. आरके बॅनरच्या प्रेमरोग, हीना, प्रेमग्रंथ, राम तेरी गंगा मैली, बोल राधा बोल अशा त्यावेळी बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या अनेक चित्रपटांसाठी वाडकरांनी गाणी गायली. ऋषी कपूर, राजीव कपूर, अनिल कपूर, अमीर खान, कमल हसन, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी अशा अनेक आघाडीच्या नायकांना त्यांनी आवाज दिला.

ए.आर. रेहमान, आर.डी. बर्मन, शिव-हरी,  बप्पी लहरी, अन्नू मलिक, विशाल भारद्वाज या हिंदीतील मोठ्या संगीतकारांबरोबर काम केलेल्या वाडकरांनी मराठीतील पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, वसंत देसाई, अशोक पत्की, अनिल-अरुण यांच्या बरोबर देखील खूप काम केले आहे. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बरोबर गायलेली त्यांची अनेक युगुल गीते लोकप्रिय आहेत.

लवकरच नगर शहरात भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत सुरेश वाडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे, अध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पद्म पुरस्कार देण्याची मागणी :
वाडकरांना आजवर मदन मोहन पुरस्कार (१९७६), मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार (२००४), महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र प्राईड अॅवार्ड  (२००७), ‘मी सिंधुताई सपकाळ’ चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायकाच्या नॅशनल फिल्म अॅवार्डने (२०११) त्यांना आजवर सन्मानित करण्यात आले आहे.
परंतु वाडकरांचे सांगीतिक योगदान एवढे दैदिप्यमान असूनही त्यांना पद्मविभूषण, पद्मश्री या पुरस्कारांनी भारत सरकारने आजवर सन्मानित केले नाही, याची खंत वाटत असल्याचे यावेळी काळे म्हणाले. पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाने वाडकरांच्या नावाची शिफारस भारत सरकारकडे करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे लवकरच करणार असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.


  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सुरेश वाडकर यांना स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार Rating: 5 Reviewed By: DNA Live24