Header Ads

 • Breaking News

  कारागृहातील काळ बंदींनी आत्मशुद्धीचा मानावा - करंजुले


  अहमदनगर । DNA Live24 - कारागृहातील सर्वच बंदीजन आधीपासून गुन्हेगारी वृत्तीचे नसतात. आणि बंदीजनांचा सर्व मुलभूत सुविधा मिळविण्याचा हक्क अबाधीत असतो. मात्र ते मायेच्या उबेपासून वंचित असतात. हीच गरज ओळखून आज ब्लँकेट वाटप करण्यात आले असून, त्यातून समाजबांधवांत मायेचा पूल बांधला जाईल, अशी अपेक्षा रोटरी क्लबचे अध्यक्ष दादासाहेब करंजुले यांनी व्यक्त केली.

  रोटरी क्लब व मानकन्हैय्या ट्रस्ट या दोन्हीही संस्था सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अग्रगण्य संस्था आहेत. कारागृहातील बंदीजन हे परिस्थितीने आज या ठिकाणी आले आहेत. यापुढील काळात ते समाजात एक सुज्ञ नागरिक म्हणून वावरतील. ब्लँकेटचे वाटप करुन त्यांना मायेची उब देण्यात आली आहे, असेही करंजुले यावेळी म्हणाले.

  जिल्हा कारागृहामध्ये रोटरी क्लब व मानकन्हैय्या ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील ज्येष्ठ बंदीजणांसाठी ५० नग ब्लँकेटस् वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या करंजुले व डॉ. सुधा कांकरिया उपस्थित होत्या. डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या, सध्याच्या थंडीच्या दिवसात बंदीजणांना रोटरी क्लब व कांकरिया ट्रस्टच्या वतीने ब्लॅकेटचे वाटप करुन सामाजिक जाणिव जागृत ठेवली आहे.

  नियमित व्यायाम, योगा आणि आधात्मिक साधनेतून आपल्यातील अवगुण हे दूर होत असतात, त्यासाठी नित्य नियमाने या गोष्टी केल्या पाहिजे. आज कारागृहात अनेक वृद्ध दिसतात अनावधानाने घडलेल्या घटनांमुळे त्यांना येथे यावे लागले. मात्र त्यांनी हाताश न होता कारागृह हे चिंतनगृह आहे, असे समजून  हा काळ म्हणजे आपला आत्मशुद्धीचा काळ आहे असे सांगितले.

  वरिष्ठ तुरंग अधिकारी शामकांत शेडगे यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले, गेल्या काही काळापासून समाजातील अनेक सेवाभावी संस्था या कारागृहात येवून निरनिराळे उपक्रम राबवतात. त्यामुळे बंदी बांधवांना मोठा मानसिक आधार मिळतो. कारागृह अधिक्षक नागनाथ सावंत यांनी आभार मानले.

  या कार्यक्रमास रोटरीचे निलेश वैकर, संजय नावंदर, अमित खर्डे, भरत लोखंडे, मंगेश दरवडे, प्रशांत बोगावत, प्रिया सोनटक्के तसेच कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय खंडागळे, तुरुंग अधिकारी तानाजी धोत्रे, देविका बेडवाल व कर्मचारी उपस्थित होते.

  Post Top Ad

  Post Bottom Ad