728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

आठवणींच्या हिंदोळ्यावर : 'आई'सम माया लावलेली 'बाई'

DNA Live24 । आठवणींच्या हिंदोळ्यावर

छायाचित्र सौजन्य - गुगल
ला  निटसं आठवत नाही आता. पण त्यावेळी मी साधारण पहिली  किंवा  दुसरी इयत्तेला असेल. त्यावेळी  आमचे आप्पा आम्हाला शेवगाववरुन खास मोहट्याच्या देवीला घेऊन आले होते. आम्ही  भावंडं, ताई, आणि  आप्पा. आताच्या वेळी  मोहटा देवीच्या गडावर ज्या सुविधा आहेत, त्यावेळी त्या काहीच नव्हत्या. रखरखत्या  ऊन्हात एसटीतुन उतरायचं आणि पायऱ्या चढून देवीच्या दर्शनाला जायचं. अक्षरशः सगळ्यांची दमछाक  व्हायची. देवीचा गडही ओसाड असायचा आणि तुरळक माणसं असायची. उन्हात पाय-या चढुन गेलं की खुप तहान लागायची. देवीचं दर्शन घ्यायचं आणि गडावर कुठे पाणी मिळतं का ते पहायचं.. अशा वेळी गडावर  मिळालेलं पाणी अक्षरश: अमृत  वाटायचं. 

असंच एकदा आम्ही दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना मागच्या बाजूला असलेल्या एका कोपर्‍यात माझे वडील थांबले. तिथं एक वयस्कर आजोबा स्टोव्हवर भजी तळत होते. स्टोव्हचा आवाज जोरात चालू असल्याने सगळे मोठ्या आवाजात बोलत होते. आम्ही लहान भावंडं तिथंच खेळत होतो. अन अचानक  भज्यांचा वास सगळीकडे दरवळला. तशी भजे खाण्याची सगळ्यांची तीव्र इच्छा झाली. आम्ही खेळणं थांबवून  त्या कढईतल्या भज्यांकडे पहात होतो. गरमागरम भज्यांच्या घाणा निघाला आणि आजोबांसोबत असलेल्या  एका आजीने हसतमुखाने आम्ही भजे मागायच्या आत छोट्या छोट्या कागदाच्या तुकड्यांवर आम्हाला  गरमागरम कांदा-भजी दिली. 

इतका आनंद झाला त्यावेळी. त्या बालपणीच्या आनंदाला आत्ताच्या कोणत्याही आनंदाची सर नाही. जणु  त्या आजीला आम्हाला काय पाहिजे हाेतं, याची जाणीव झाली होती. मी भजी खात खात त्या माऊलीचा चेहरा न्याहाळत होतो. हसतमुखाने आणि आस्थेने ती आप्पा आणि ताईबरोबर बोलत होती. आप्पा पोलिस असल्याने त्यांच्या बोलण्यात एक रुबाब होता. पण ती दोघं मायेने सगळ्यांची विचारपूस करत होती. जातांना पाथर्डीला थांबुन घरी येण्याचा आग्रह करीत होती. भजी खाऊन आणि माठातलं गार पाणी पिऊन आम्ही सगळे खाली निघालो. पण त्या माऊलीचा हसतमुख चेहरा डोळ्यासमोरुन जात नव्हता. 

ती माऊली म्हणजे आपली 'बाई'. अशी बाईची आणि माझी पहिली भेट झाली. त्यावेळी असं मनातही आलं नाही की हिच माऊली पुढे आपल्या बहिणीची सासू होणार आहे. सुनितालाही वाटलं नसेल की हीच माझी भावी  सासू होइल. काही वर्षांनी आमचे आप्पाही वारले. गरीबी आणि हलाखीचे दिवस चालु झाले होते. सुनिता आणि ताई लोकांची घरकाम करायची. इकडे मी, सुधीर आणि बाळी अजून शिक्षणच घेत होतो. अचानक एक दिवस घरात सुनिताच्या लग्नाचा विषय निघाला. रमेशभाऊ घरी आला व मला पाथर्डीला घेऊन गेला. तेव्हा मी नववी दहावीला असेल. पण घरात मीच मोठा असल्याने तो मला घेऊन गेला. 

पाथर्डीला गेल्यावर घर बघितलं. भावजींना भेटलो आणि जेवत असताना माझं लक्ष 'बाई'कडे गेलं. मला अचानक आठवलं की, ह्या तर लहानपणी गडावर दिसलेल्या आज्जी ! आज्जी परत दिसल्याचा मनात आनंद झाला. तिथून जाताना बाई आणि नानांच्या पाया पडून निघालो. घरी आल्याबरोबर सुनिताला बाकीचं काही नाही, पण एक सांगितलं. "सुनिता तुझी सासु खुप चांगली आहे." तर अशी झाली बाईची आणि माझी पुन्हा दुस-यांदा भेट. सुनिताचं लग्न झालं. अन माझ्या पाथर्डीला चकरा वाढल्या. कधी मोहट्याच्या देवीला, तर कधी खास सुनिताला भेटायला. 

मी नोकरीला लागायच्या आधीची गोष्ट. एक दिवस असाच माझा मित्र आणि मी मोहट्यावरुन पाथर्डीला आलो. बाई नाना घरात बसलेले होते. बाईला मला पाहून खुप आनंद झाला. तसा तो नेहमीच व्हायचाही. वाड्यातलं बाईचं घर जरी  छोटं असलं तरी तिच्यासाठी ते संपूर्ण विश्व होतं. विशिष्ट पध्दतीने मांडी घालुन दारात हसतमुखाने बसलेले नाना आणि नेहमी त्यांच्या आसपास असणारी बाई. हे आजही डोळ्यासमोर आहेत. बाईने माझी आणि मित्राची चौकशी करून जेवायला तुमच्या आवडीचं काय करु म्हणून विचारलं. मी नको नको म्हणत होतो. पण सुनिताने सांगितलंच. बाई, गणेशला काळ्या मसाल्याचं वांगं आणि चुलीवरची बाजरीची भाकरी आवडते. झालं. बाईने लगेच खास काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी करुन आग्रह करुन करुन मला आणि मित्राला पोटभर खायला घातलं. आम्ही तृप्त मनाने बाईच्या स्वयंपाकाची स्तुती केली. बाईलाही खुप आनंद झाला. 

या प्रसंगानंतर मला आठवतंय मी ज्या-ज्या वेळी पाथर्डीला गेलो, त्या-त्या वेळी बाईने शक्य होईल तेवढ्या वेळी मला वांग्याची भाजी आणि भाकरी खाऊ घातली. आजही घरी वांग्याची भाजी आणि भाकरी खाताना बाईची खूप आठवण येते.

संच एकदा नविनच लग्न झालेलं असताना गाडीवर मोहट्याला गेलो. गडावरचा लहानपणीचा भज्यांचा किस्सा स्वातीला सांगितला. येताना साहजिकच पाथर्डीला आलो. वाड्यातील सगळ्यांना भेटलो. बाई नानांच्या  पाया पडलो. त्यावेळी बाईने मायेने आमच्या दोघांच्या तोंडावरून फिरवलेला चरबट झालेला अनुभवी हात आम्हाला मोरपीसांसारखा वाटला. माझी लहानपणीपासुनची फरपट बाईने पाहिली होती. म्हणुन तिला माझी हळुहळु होत असलेली प्रगती पाहून खुप आनंद व्हायचा. आपलं नवीन घर झाल्यावर आम्ही दोघांनी एकदा बाई आणि नानांना घरी येण्याचा खुप आग्रह केला. पण ते काही तयार होत नव्हते. सुनिताही म्हणाली, "अरे गणेश,  ते दोघं कधीही पाथर्डी सोडून कुठेच जात नाहीत. पण माझ्या आणि स्वातीच्या आग्रहामुळे दोघेही यायला तयार झाले. अन पुढच्या आठवड्यात येऊ, असे म्हणाले.

खरोखरच त्यानंतर चार पाच दिवसांनी बाई आणि नाना आलमगीरला आमच्या घरी आले. आम्हा दोघांना इतका आनंद झाला. कारण 'बाई आणि नाना' या जोडीबद्दल पहिल्यापासूनच आमच्या मनात प्रचंड आदर हाेता. कळस म्हणजे बाईने पाथर्डी वरुन येताना खास माझ्यासाठी बाजरीची भाकरी आणि काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी करुन आणली होती. आल्याबरोबर तिने फडक्यातली भाकरी सोडली व मला लगेच खा,  म्हणाली. 'तुला आवडते ना? म्हणुन करुन आणली." सुदाम्याने श्रीकृष्णाला पुरचुंडीत बांधुन आणलेल्या पोह्यांची सर त्या भाजीत आणि भाकरीत होती. आजही हे लिहिताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येतंय. 😪😪😪😪 

घराच्या दाराजवळ बसलेली बाई, येणाऱ्या जाणाऱ्यांना आपुलकीने विचारपूस करणारी बाई, हक्काने सगळ्यांना चहाचा आग्रह करणारी बाई, म्हणजे एक हसमुख अजब रसायन होतं. घरच्या गरीबीची बाईला जाणीव होती. पण मनाची ओसंडून वाहणारी श्रीमंती तिने तसूभरही कमी होवू दिली नाही. बाईंच्या स्वभावाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे बाईची कुणाबद्दलही काहीएक तक्रार नसायची. बाईची पाथर्डीशी मनाने घट्ट नाळ जुळलेली होती. तिने शेवटपर्यंत ती कायम ठेवली. पाथर्डी म्हणजे बाईंसाठी संपूर्ण जग होतं.

न अचानक त्या दिवशी सकाळीच भावजींचा फोन आला, गणेश आपली बाई गेली. एका क्षणात सगळ्या घटना, आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. बाईबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. आठवणींच्या रुपाने बाई सदैव आपल्यातच राहिल. अशा निर्मळ मनाच्या माऊलीस आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.!!!

जो आवडतो सर्वांना
तोचि आवडे देवाला.!

- गणेश लकारे, आलमगीर, नगर
(लेखक पोलिस दलात नोकरीला आहेत)
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: आठवणींच्या हिंदोळ्यावर : 'आई'सम माया लावलेली 'बाई' Rating: 5 Reviewed By: DNA Live24