कर्नाटकात भाजपची 'दांडी गुल'; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा राजीनामा


बंगलुरु : DNALive24-

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बहुमत स्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कर्नाटकाच्या अग्निपरीक्षेत तोंडघशी पडावे लागले आहे. विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या आधीच दीड दिवसाचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विधानसभेतील भाषण उरकून येडियुरप्पा राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी रवाना झाले आहेत.
224 जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 104, काँग्रेसला 78, जेडीएस 38 आणि अन्य 2 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 112 इतका आहे. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले होते. मात्र काँग्रेस आणि जेडीएस ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्यपालांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने २४ तासात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान विधानसभेत सर्व आमदार येण्यापूर्वी आमदारांच्या प्लवपालवीचा खेळ रंगला होता. आता भाजप सरकार गडगडले असल्याने काँग्रेस व जेडीएसला सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसने यापूर्वीच जेडीएसला पाठिंबा दिल्याने जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत.