धक्कादायक : शिक्षा झाल्यानंतर आरोपींनी जाळले बलात्कार पीडित मुलीला


रांची : वृत्तसंस्था - सामूहिक बलात्कारप्रकरणी जात पंचायतीने शिक्षा केल्याने आरोपींनी अल्पवयीन पीडितेला जिवंत जाळले. हा धक्‍कादायक प्रकार झारखंडमधील चत्रा जिल्ह्यातील तेंदुआ गावात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या नातेवाइकांच्या लग्‍नसमारंभास गेली होती. यावेळी पाच नराधमांनी तिला बळजबरीने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत न जाता जात पंचायतीमध्ये याबाबत तक्रार दिली. जात पंचायतीने या आरोपींना फक्‍त शंभर उठाबशा आणि दंडात्मक शिक्षा दिली.

या शिक्षेचा राग मनात धरून पाच जणांनी पीडितेच्या घरात जाऊन तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली आणि तिला जिवंत जाळले. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर अन्य चार आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.