धनंजय मुंडेच बीडमधून राष्ट्रवादीला संपवतील : पंकजा मुंडे


मुंबई : DNALive24 - विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवाराने ऐनवेळी माघार घेणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची अगतिकता आहे, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी मौन सोडले.


''बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हे नेतेच पवार साहेबांच्या पक्षाची वाताहत केल्याशिवाय राहणार नाहीत,'' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

''राष्ट्रवादीमधील पवार घराण्याचा लॉयल लोकांवर अन्याय होतो आणि अपमानास्पद वागणूक मिळते, त्याचंच फलित म्हणजे सुरेश धस आमच्याबरोबर आहेत,'' असंही त्या म्हणाल्या.

''बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि बंधू रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतली, राजकारणाच्या इतिहासात असं कधीच झालं नाही. अधिकृत उमेदवार माघार घेतो ही राष्ट्रवादीची अगतिकता आहे. त्यातही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आश्चर्यचकित करणारा आहे,'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, आता आम्ही पुढच्या तयारीला लागलो आहोत, आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही ताकत लावू, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.