Our Feeds

बुधवार, २३ मे, २०१८

DNA Live24

मोदींच्या विरोधात देशातील १२ पक्षांचे सर्वात मोठे शक्तीप्रदर्शन!बंगळूरू : DNALive24 (विशेष)-
हिंदुत्व व विकासाचा अजेंडा समोर ठेऊन २०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या विरोधात देशातील प्रमुख १२ विरोधी पक्षांनी चार वर्षातील आतापर्यंतचे सर्वात मोठे शक्तीप्रदर्शन केले. निमित्त होते ते कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होत असलेल्या एच डी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याचे. मोदी- शहा या जोडगोळीच्या शत:प्रतिशत भाजपच्या खेळीने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेल्या विरोधकांची एकी आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिल्यास भाजपसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा असणार आहे.

कर्नाटकात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर दीड दिवस मुख्यमंत्री राहिलेल्या भाजपच्या बी एस येडीयुरप्पा यांना राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेसचे जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहणार आहेत.

कर्नाटकात भाजपची खेळी उधळून लावल्यानंतर कॉंग्रेस-जेडीएसने शपथविधीचा मुहूर्त साधत विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु केला होता. शपथविधीसाठी देशभरातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधील, शरद पवार, ममता बॅनर्जींसह दिग्गजांचा समावेश होता.

सत्तेवर येण्यासाठी २०१४ साली भाजपने विविध पक्षांची मोट बांधली होती. निवडणुकीनंतर मात्र शत:प्रतिशत भाजपचा नारा देत भाजपने मित्र पक्षांनाही त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक मित्रपक्ष भाजपवर नाराज आहेत. त्यातच कर्नाटक विजयानंतर हुरूप चढलेल्या कॉंग्रेसने २०१९ साठी सर्वांना एकत्रित आणायचे प्रयत्न सुरु केले आहेत.

लोकशाही धोक्यात की विरोधक
२०१४ सालच्या निवडणुकीची आकडेवारी पहिली असता विरोधकांमध्ये एकी नसल्याने अनेक ठिकाणी पराभव झाला. त्यावेळी अनेक ठिकाणी भाजपला मिळालेल्या मतांपेक्षा विरोधकांची मते जास्त होती. त्यामुळे गेल्यावेळी झालेली चूक यावेळी होऊ नये यासाठी विरोधक सतर्क झालेले दिसतात. देशात लोकशाही धोक्यात असल्याने एकत्र येत असल्याचे जरी विरोधकांकडून सांगण्यात येत असले तरी स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठीच विरोधक एकत्र येत असल्याचे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे.

शपथविधीसाठी उपस्थित होते हे दिग्गज 
या शपथविधीसाठी देशातील विविध पक्षाच्या प्रमुखांसह दिग्गजांची उपस्थिती होती. त्यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, बसपा अध्यक्ष मायावती, सपा नेते अखिलेश यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कमल हसन, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आदींचा समावेश होता.


Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »