विधानपरिषद निकाल : भाजप, सेना दोन तर राष्ट्रवादी एका जागेवर विजयी


मुंबई : DNALive24-
विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल जाहिर झाला असून, यामध्ये शिवसेनेला 2, भाजपला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय झाला आहे.

अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला. कारण अमरावतीत काँग्रेसची स्वत:ची 128 मतं असताना काँग्रेस उमेदवाराला केवळ 17 मतं मिळाली. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी 458 मतं मिळवत मोठा विजय मिळवला.

नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली.  पालघरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भाजपला हा मोठा दणका आहे. शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी जवळपास 200 मतांनी विजय मिळवला. दराडेंना 412 मतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजी सहाणे यांना 219 मतं मिळाली.

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे  यांचा पराभव केला. तटकरेंना तब्बल 620 तर साबळेंना 306 मतं मिळाली.

परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळवला. त्यांना 256 मतं मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पदरात 221 मतं पडली.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपच्या रामदास आंबटकर यांनी विजय मिळवला. रामदास आंबटकर यांना 528 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ हे 491 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.