चित्तथरारक झटापटीनंतर २ दरोडेखोर जेरबंद


अहमदनगर । DNA Live24 - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघा दरोडेखोरांना चित्तथरारक पाठलाग व झटापट करुन पकडण्यात आले आहे. सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे व सहकाऱ्यांनी ही धाडसी कामगिरी केली. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एपीआय शिंदे हे जखमी झाले. त्यांच्या पायाला मार लागूनही त्यांनी व सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आरोपींना पकडले. हा थरार नेवासे तालुक्यातील सोनई शिवारात बुधवारी रात्री घडला.

ऑल आऊट मोहिमेदरम्यान सोनई पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्याचवेळी सोनई ते मोरे चिंचोरे रस्त्यावर शेटे वस्तीजवळ सहा ते सात आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीने अंधारात लपलेले असल्याची माहिती एपीआय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकाऱ्यांसोबत सापळा रचला. मात्र आरोपींना पोलिस आल्याची कुणकुण लागताच त्यांनी पळ काढला. एपीआय शिंदे व सहकाऱ्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग करुन दोघांना शिताफीने पकडले. त्यांची मोटारसायकलही जप्त केली. मात्र दरोडेखोरांनी एपीआय शिंदे व सहकाऱ्यांवर हल्ला केला. 

तरीही पोलिसांनी शिताफीने दोघांच्या मुसक्या आवळल्या. इतर आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पकडलेल्या आरोपींची नावे सुरेश बडोद भोसले (वय ३३, रा. पढेगाव, ता. कोपरगाव) व शिवाजी नाना गिऱ्हे (वय २४, रा. पिचडगाव, ता. नेवासे) अशी आहेत. शिवाजी गिऱ्हे याच्या ताब्यात एक धारदार लोखंडी कत्ती मिळाली. त्यांच्याकडून हत्यारे व मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. चौकशीनंतर दोघेही खतरनाक व सराईत दरोडेखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दोघेही सराईत - दोघांपैकी सुरेश भोसले याच्यावर कोपरगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्ह्याची, नगर तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्याची व कोपरगाव पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टच्या गुन्ह्याची नोंद आहे. ही टोळी ड्रॉपचे (स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणे) गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, आर्म अॅक्ट, दरोड्याची पूर्वतयारी, आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
.
यांची जिगरबाज कामगिरी - पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गर्शनखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे, फौजदार आर. एन. ससाणे, पोलिस कॉन्स्टेबल काका मोरे, विठ्ठल थोरात, अमोल भांड, बाबा वाघमोडे, मोहन भेटे, शिवाजी माने, ताके, पालवे आदींच्या पथकाने ही जिगरबाज कामगिरी केली आहे. त्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
.
गुन्ह्याचा फुटली वाचा  -  शिवाजी गिऱ्हे या आरोपीने औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. चाकूने वार करुन सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल लांबवल्याची कबुली त्याने दिली आहे. यातील मूळ फिर्यादीने सोनई पोलिस ठाण्यात येऊन गिऱ्हे याला ओळखले. तसेच या टोळीने नेवासे तालुक्यातील लोहोगाव शिवारातही दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
.
सोनई पोलिसांची कामगिरी – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑल आऊट मोहिमेत सोनई पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. गेल्या आठवड्याभरात दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल झाली. तसेच प्रतिबंधात्मक कारवायाही होत आहेत. या मोहिमेमुळे औरंगाबाद रस्त्यावरील जबरी चोऱ्या व लुटमारीला आळा बसला आहे. तसेच गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या