केडगाव घटनेचे विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले : अंकुश काकडे


शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याने महापालिका निवडणुकीची रणधुमाळीला प्रारंभ (छाया-वाजिद शेख)
नगर :
केडगावची घडलेली घटना दुर्देवी असून, या घटनेबद्दल कार्यकर्त्यांनी कोणतेही मत प्रदर्शित करुन नये. इतर पक्षांनी या घटनेचे सत्ता मिळविण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले. येणारी महापालिका निवडणूक आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले. तर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादीचीच राहणार असल्याचे अधोरेखित करुन नेत्यांनी आपली मते चार भिंतीत मांडण्याचा टोला त्यांनी पांडुरंग अभंग यांना लगावला.

महापालिका निवडणूक तसेच येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरशहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काकडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणापाटील, आ.अरुणकाका जगताप, आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, संजय झिंजे, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, समद खान, आरिफ शेख, सलीम भंगारवाला, विपुल शेटीया, संपत बारस्कर, अविनाश घुले संभाजी पवार, संजय सपकाळ, सुरेश बनसोडे, अंबादास गारुडकर, महिला राष्ट्रवादीच्या अ‍ॅड.शारदा लगड, निर्मला मालपाणी, रेशमा आठरे, राजश्री मांढरे, किसनराव लोटके, विनीत पाऊलबुद्धे, दीपक सूळ आदी उपस्थित होते.

काकडे पुढे म्हणाले की, पालिका निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी विचारविनिमय करून समविचारी पक्षांशी आघाडी करायची का नाही? हा निर्णय घ्यायचा आहे. आघाडी करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये दुमत आहे. यासंदर्भात समिती गठित करून समविचारी पक्षांशी युती करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी सकारात्मक असून काँग्रेस कडून प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विकासात्मक कामांद्वारे येत्या मनपाच्या निवडणुकीत जनतेसमोर जाणार आहे. सध्याची महापालिकेची परिस्थिती बिकट बनली आहे. मागील पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात शिवसेनेच्या माजी आमदारांनी काय काम केले सर्वश्रुत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दिलीप झिंजुर्डे यांनी आपल्या युवा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अजिंक्य राणापाटील म्हणाले की, भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वच क्षेत्रात असंतोष पसरला आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून. युवकांच्या रोजगाराच्या प्रश्‍न सुटलेला नाही. नगरची जनता सुजाण असल्याने भाजपच्या लाटेला बळी न पडता त्यांनी आ.संग्राम जगताप यांना निवडून दिले. भाजप सरकारने फसवी कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांची चेष्टा केली आहे. ही कर्जमाफी कागदावरच राहिली असून, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांना कोणतीच बँक यापुढे कर्ज देत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या खिसेकापू सरकारला धडा शिकविण्यासाठी पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीमागे ठाम उभे राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

दादाभाऊ कळमकर यांनी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. कारखानदार आत्महत्या करत असून, लघू उद्योजक डबघाईस आले आहे. देश आर्थिक संकटात सापडला असून, थापडी मोदी सरकार याला जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. तर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवले. मात्र सध्या सत्ताधार्‍यांना बल्ब लावण्याची कुवत नाही. राष्ट्रवादीने मंजूर केलेल्या कामांचे नारळ शिवसेनेने फोडले. भाजप-सेनेच्या भांडणात शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. शहराच्या विकासासाठी सत्ताधार्‍यांना निधी देखील आणता आला नसल्याचा आरोप त्यांनी केला. या मेळाव्यास राष्ट्रवादी सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या