100 किलो बियांपासून बनविला 'बिजानन' गणेशनगर : DNALive24-

आई वडील व नातेवाईक नसलेली मुले घरगुती व कौटुंबिक सुखाला व जिव्हाळयाला पारखी होतात, म्हणून येथील सर्वाधिक पारितोषिके विजेता हरहुन्नरी कलाकार डॉ. अमोल बागूल यांनी सामाजिक जाणीव जपत अश्या मुलांना घरातल्या सुरक्षा व आपुलकीचे वातावरण जगता यावे याकरिता या गणेशोत्सवात स्वतः च्या घरात सुमारे तीस अनाथ, वंचित मुले सांभाळून त्यांना 'माझं घर' या शब्दाचा अनुभव दिला. अन या मुलांबरोबर 100 किलो बियांपासून  'बिजानन' गणेश देखील बनविला.

महात्मा फुले छात्रालयासह सुमारे पाच संस्थातील तीस मुलांनीच स्वतःच्या हातानेच शाडू माती गणेशमूर्ती बनविली व मुलांनीच रंगवून मुलांनीच गणेशस्थापना केली. दररोज सकाळ संध्याकाळी आरती तसेच विविध मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेत मुले सहभागी होतात. योगसाधना, सूर्यनमस्कार आदि दैनंदिन कामे करतात. वैद्यकीय तपासणी, पुस्तक वाचन, टीव्ही-रेडियो-वर्तमानपत्रे वाचन, विविध खेळ, मनोरंजक खेळ, बासरीवादन, तबलावादन, गायन आदि दैनंदिन उपक्रमांच्या माध्यमातून मुले बागूल यांच्या घरी रमुन गेली.

पाहुन्यासारखे न राहता घरातील स्वातंत्र्य अनुभवता यावे म्हणून बागूल यांनी त्यांचा अभ्यास घेण्याबरोबरच दमणाऱ्या मुलांचे हातपाय-डोके ही दाबले. त्यांच्यासाठी चपला-बूटं, नवे कपड़े, शैक्षणिक साहित्य घेताना त्यांची पसंतीही जपली. 'आज काय ख़ाणार?' असे विचारून त्यांची न खाल्लेल्या न पाहिलेल्या खाद्य पदार्थांची देखील हौस पुरविली.

घरगुती गणेशोत्सव पर्यावरणपुरक आरास करताना मुलांनी बागूल यांच्या मदतीने १० बाय १० फुटांच्या कागदावर भव्य गणपती चितारुन विविध फळ-फूल झाडांच्या सुमारे १५० प्रकारच्या सुमारे १०० किलो बियांपासून 'बिजानन'गणेशाची बियांची रांगोळीवजा कलाकृती देखील तयार केली. विसर्जनाच्या दिवशी ह्या बिया मिरवणूक मार्गावर गणेशभक्तांना वितरित केल्या जाणार आहेत.

या उपक्रमात डॉ. बागूल यांना गणेश कोरडे, मंगेश गराडे,  शैलेश थोरात, किरण घालमे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.