शिक्षक, केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणार : पालकमंत्री राम शिंदे


नगर । DNA Live24 - जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी निधी आणि शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत राज्य स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन राज्‍याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कार-2018 वितरण पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील या होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, अर्थ व बांधकाम सभापती कैलास वाघचौरे, कृषी सभापती अजय फटांगरे, राजेश परजणे, शिवाजीराव गाडे, प्रभावतीताई ढाकणे, पंचायत समिती सभापती राहुल झावरे, अनुसयाताई होन, बाळासाहेब लटके, व्याख्याते जितेंद्र मेटकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, उपक्रमशीलता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून जिल्हा परिषदेने शाळांचा दर्जा उंचावला आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेली येथील शिक्षकांची बांधीलकी ही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुरु असलेले उपक्रम आणि त्यासाठी येथील शिक्षक घेत असलेले प्रयत्न सर्वच ठिकाणी घेण्याची गरज आहे. चांगला माणूस घडवण्याचे काम शिक्षकांचे आहे. त्यामुळे या जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांच्या विकासासाठीची त्यांची धडपड दिसून येते, असे ते म्हणाले.

आता ई-लर्निंग आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा जमाना आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी झाले आहे. जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळत आहे. आपला विद्यार्थी या स्पर्धात्मक युगात टिकू शकेल, असे बनविण्याचे काम शिक्षक करीत आहेत. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तास. मुलांसाठी आनंदनगरी, बाळमेळा अशा उपक्रम निश्चितच इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक असल्याचे प्रा. शिंदे यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील शाळा खोल्यांसाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करु. सध्या जिल्हा नियोजन निधीतून पुनर्विनियोजन प्रस्तावातून साडेतीन कोटी, श्री साईबाबा विश्वस्त संस्थानकडून तीस कोटीपैकी 10 कोटी निधी या बांधकामासाठी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृतिशील शिक्षण देत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील शिक्षण स्तर उंचावण्यासाठी येथील जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि सर्व शिक्षक कार्यरत आहेत. त्याचे फलित आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेत दिसून आले. शिक्षकांनी यापुढेही असेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. यावर्षी जाहीर करण्यात आलेले शिक्षक पुरस्कार हे गुणवत्तेने देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

उपाध्यश्रा राजश्री घुले, अनुराधा नागवडे यांनीही आपल्या मनोगतात, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे सांगितले.

यावेळी व्याख्याते श्री. मेटकर यांचे सध्याची शिक्षणपद्धती यावर व्याख्यान झाले. प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माने यांनी शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय एक याप्रमाणे 14 शिक्षकांना तसेच एका केंद्रप्रमुखांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासोबतच विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमात पारितोषिके पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.