अहमदनगर जिल्ह्याला रस्त्यांसाठी ७७५ कोटींचा निधी : ना. पंकजाताई मुंडेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमुळे विकासाची गती वाढणार - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे

नगर: 
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात 1 हजार 361 किलोमीटर लांबीचे रस्ते होणार असून त्यासाठी 775 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची विकासाची गती वाढेल, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज जिल्ह्यातील नगर-राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील चिचोंडी शिराळ येथे तर पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील ढोरजळगाव आणि शेवगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ तर काही कामांचे लोकार्पण केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्रा. भानुदास बेरड, अमित पालवे, अक्षय कर्डिले, संदीप कर्डिले, सुभाष पाटील, संध्या आठरे,  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता डी.जी. देशमुख, कार्यकारी अभियंता ए.डी. पेशवे आदींची उपस्थिती होती.

ग्रामविकासमंत्री मुंडे यांनी चिचोंडी शिराळ येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार अभियान आदी कामांचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत नगर विधानसभा मतदारसंघात 27 रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असून 120 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांना 66 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
राज्यात सर्वत्र विकासकामांना गती आली असून मागील अनेक वर्षे विकासाच्या क्षेत्रात मागे राहिलेल्या गाव-खेड्यांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचे काम होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाने शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य घटकांना ताकद देण्याचे ठरविले आहे. उज्ज्वला गॅस योजना, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस आणि वीज पोहोचवण्याचे काम सुरु आहे. याबरोबरच कोणीही बेघर राहू नये, यासाठी सर्वांसाठी घरे हा कार्यक्रम केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने हाती घेतला आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून लोकांना शासकीय योजनांशी जोडण्यात आले. लोकसहभागातून अनेक कामे मार्गी लागली. राज्यातील टॅंकर्सची संख्या घटली. याशिवाय, महिलांच्या उन्नतीसाठी राज्य शासनाने विविध योजना आखल्या असून अस्मिता योजनेच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक आधार बळकट करण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आ. कर्डिले यांनी वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही राज्य शासनाने ग्रामविकास मंत्री पंकजाताईंच्या पाठपुराव्यामुळे 56 कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. खा. गांधी यांनी केंद्राच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात चांगल्या प्रकारे होत असल्याचे नमूद केले. श्री. पाचपुते यांनीही केंद्र व राज्य शासनाने सामान्य नागरिकांसाठी विकास योजना तयार केल्या असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नगर-राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी गर्दी केली होती. यांत महिलावर्गाची संख्या लक्षणीय होती.

याशिवाय, ढोरजळगाव येथे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या कार्यक्रमातही ग्रामविकासमंत्री पंकजाताईंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील विविध कामांचा शुभारंभ केला.