वाळू तस्करांवर मोक्का लावण्याची मागणी


अहमदनगर | DNA Live24 : महसुल अधिकार्‍यांवर जीवघेणे हल्ले करणार्‍या वाळू तस्करांवर मोक्का लावण्याची मागणी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पिपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती थांबविण्यास अकार्यक्षम ठरत असलेल्या भाजप-शिवसेना सत्ताधार्‍यांचा रविवार दि.30 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारकात निषेध व्यक्त केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर नुकताच वाळू तस्करांनी हल्ला केला. महसुल अधिकार्‍यांवर अनेक हल्ले झाले असून, कायद्याचा धाक नसल्याने वाळू तस्करांचे धाडस वाढत आहे. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी कायदा-सुव्यवस्था सांभाळणारे जिल्ह्याचे प्रमुख आहेत. त्यांच्यावरच हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांच्या जीव किती सुरक्षित असल्याचा प्रश्‍न निर्माण होत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यासह राज्यात लँड माफिया व वाळू तस्करांना पेव फुटले आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी कायद्याच्या भितीची आवश्यकता असून, अशा लॅण्ड माफिया व वाळू तस्करांवर मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना दोघांच्या भांडणात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढून सरकार कुचकामी ठरले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या मागणीसाठी कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, विरबहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम आदि प्रयत्नशील आहेत.


(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)