सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आला घरफोडीचा गुन्हा


अहमदनगर | DNA Live24 - जनरल स्टोअर दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून चोरट्यांनी घरफोडी केली. मात्र त्यांचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांना घरफोडी करणाऱ्या चोरट्यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले. हा प्रकार नेवासा शहरामध्ये घडला. नेवासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे यांनी याप्रकरणी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

राहूल जगन्नाथ ठाकरे (वय १९) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम येथे काही दिवसांपूर्वी आभा किराणा जनरल स्टोअर्स या दुकानात घरफोडी झाली होती. हा घरफोडीचा गुन्हा राहुल ठाकरे व त्याच्या काही साथीदारांनी केला असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राहुल ठाकरे याला ताब्यात घेतले त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेला २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

गुन्ह्यात सोडलेले 3 मोबाईल व पत्रा कापण्यासाठी तसेच नटबोल्ट खोलण्यासाठी वापरलेला पान्हा राहुलने पोलिसांच्या हवाली केला आहे. राहुलचे इतर साथीदार कोण होते तसेच त्यांनी आणखी इतर ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत किंवा काय याबाबत एपीआय गोरडे व त्यांचे सहकारी पोलीस अधिक तपास करत आहेत. ज्या दुकानात घरफोडी झाली तिथे सीसीटीव्ही बसवले होते. त्यामुळे पोलिसांना चोरट्यांची ओळख पटवणे सोपे गेले.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)